आरोग्य समिती सदस्यांचे राजीनामे, तेव्हा झाली नायरमधील ‘त्या’ डॉक्टरांवर कारवाई

127

वरळीतील कामगार वसाहतीमधील बीडीडी चाळीतील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या दाम्प्त्यावर नायर रुग्णालयात उपचार करण्यात दिरंगाई करण्यात आली. या दिरंगाईबाबतचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. यातील भाजलेल्या चार महिन्यांच्या बाळाचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धास्तावलेल्या नायर रुग्णालयाने या संबंधित घटनेबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र कारवाई होत नाही, म्हणून अखेर महापालिकेच्या आरोग्य समितीमधील भाजपाच्या ११ सदस्यांनी राजीनामे दिले, त्यानंतर  रुग्णालयातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा करून उपचारात दिरंगाई केल्यामुळे संबंधित २ डॉक्टर आणि १ नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या सदस्यांनी दिला राजीनामे

बिंदू त्रिवेदी, हर्षिता नार्वेकर, सारिका पवार, बिना दोषी, प्रियांका मोरे, निल सोमैया, अनिता पांचाळ, सुनीता मेहता, प्रकाश मोरे, योगिता कोळी, राजुल देसाई.

पीडित कुटुंबीयांना २५ लाख द्या

गुरुवारी मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आ. योगेश सागर, आ. अमित साटम, गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची भेट घेऊन झालेल्या दुर्दैवी प्रकाराची सविस्तर माहिती घेतली. यावेळी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून रुग्णसेवेत अक्षम्य हेळसांड, दुर्लक्ष व गोल्डन आवरमध्ये विलंब झाल्याचे मान्य केले. यावेळी भाजपा शिष्टमंडळाने मृत बालकाच्या नातेवाईकांना रुपये पंचवीस लाख नुकसानभरपाई द्यावी आणि सदर घटनेची चौकशी महापालिकेबाहेरील तज्ञ डॉक्टरांच्या त्रयस्थ समितीद्वारे करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच रुग्णालयातील दोषी डॉक्टरांवर आग्रीपाडा पोलिस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे.

( हेही वाचा : आश्चर्य! लोकर देणारे प्राणीच थंडीने गारठून मेले! )

पेंग्विनवर उधळपट्टी; जनता वाऱ्यावर

मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणेवर दरवर्षी ४५०० कोटी रुपये खर्च करते. त्यानंतरही नायर रुग्णालय प्रशासन / डॉक्टरांचा निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे सुरुवातीच्या ४५ मिनिटांत डॉक्टरांनी उपचार न केल्यामुळे एका दुर्दैवी चिमुकल्याचा अंत होणे ही अतिशय शरमेची बाब आहे. एकीकडे केवळ युवराजांच्या हट्टापोटी भारतीय प्राणी, पक्षी सोडून परदेशी पेंग्विनवर दररोज रु. १.५ लाख रुपये खर्च करण्याऱ्या सत्ताधारी पक्षाला या बालमृत्यूचे सोयरसुतक नाही, ही बाब तमाम मुंबईकरांसाठी दुर्दैवी असल्याची टीका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतरही नायर रुग्णालयात सत्ताधारी महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष यापैकी कोणीही  फिरकलेसुद्धा नाहीत; साधी दखलही घेतली नाही. मुर्दाड प्रशासनाचे व सत्ताधार्‍यांचे हे वर्तन अत्यंत वेदनादायी, चिंताजनक आणि निंदनीय आहे अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश निर्गमित केले होते. रुग्णालय प्रशासनाकडून चौकशी अंती अखेर दोन डॉक्टर आणि १ नर्सला निलंबिन करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाची १ महापालिकेचा डॉक्टर आणि २ खासगी डॉक्टर यांची समिती चौकशा करणार असून ३ दिवसांत याचा अहवाल सादर होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.