दादर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवरील स्मारकात दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून चैत्यभूमी येथे अनुयायी येतात. त्यानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात रंगरंगोटी, दिवाबत्ती, पुष्प सजावट आदी कामे केली जातात. तसेच डॉ. बाबासाहेबांचे निवास असलेले राजगृह आणि परळ येथील बीआयटी चाळ या ठिकाणी देखील अनुयायी भेट देत असल्याने तेथेही व्यवस्था करण्यात येते. दरवर्षांप्रमाणे ही सर्व कामे पूर्णत्वास आली असून त्याची पाहणी डॉ. संजीव कुमार यांनी गुरुवारी केली. तसेच पोलिस प्रशासनाच्या तयारीची पाहणीही डॉ. संजीवकुमार यांनी पोलिस उप आयुक्त प्रणय अशोक यांच्यासह केली.
थेट प्रक्षेपणाची व्यवस्था
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे करण्यात येत असलेल्या तयारीसह थेट प्रक्षेपण व्यवस्थेची त्याचबरोबर डॉ. बाबासाहेबांचे निवास असलेले राजगृह आणि परळ येथील बीआयटी चाळ या ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेची अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांनी पाहणी केली. याप्रसंगी महानगरपालिका उपायुक्त (परिमंडळ २) हर्षद काळे यांच्यासह जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, एफ/दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, एफ/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा तीन दिवसांनी महापौरांना आठवण झाली वरळीतील जखमींची)
यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे सोमवार, ६ डिसेंबर २०२१ रोजी चैत्यभूमी येथे होणारी शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सकाळी ७.४५ ते सकाळी १० कालावधीमध्ये केले जाणार आहे. सोबत विविध समाजमाध्यमांवरही हे प्रक्षेपण पाहून अभिवादन करता येणार आहे. त्यासाठी यूट्यूब: https://bit.ly/6december21YT/ फेसबूक: https://bit.ly/6december21FB / ट्विटर: https://bit.ly/6december21TT या लिंकचा उपयोग करता येईल.
Join Our WhatsApp Community