मुंबईत शेकडो ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्या आजही इतिहासाची जिवंत साक्ष देतात, त्यातीलच एक म्हणजे माहीम किल्ला! मात्र दुर्दैवाने या ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे, अशी राजकीय इच्छाशक्ती नसल्याने या किल्ल्यामध्ये चक्क झोपडपट्टी वसली आहे. आता जर या किल्ल्याकडे लक्ष दिले नाही, तर तो काही वर्षांत नामशेष होईल, अशी वेळ आली आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आहेत, ते पर्यटन या विषयावर अधिक संवेदनशील आहेत. म्हणूनच त्यांनी माहीमच्या समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे, परंतु तेथूनच हाकेच्या अंतरावर असलेला माहीम किल्ला हादेखील मुंबईच्या पर्यटनाला चालना देऊ शकतो, त्यामुळे ते या किल्ल्याला गतवैभव मिळवून देतील का, असा प्रश्न आता इतिहासप्रेमी विचारत आहेत.
काय आहे किल्ल्याचा इतिहास?
अकराव्या शतकामध्ये प्रताप बिंबाच्या काळात या किल्ल्याच्या बांधकामास सुरूवात झाली. मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या या किल्ल्याने अनेक सागरी युद्ध अनुभवली. केळवे माहीम ताब्यातून गेल्यावर प्रताप बिंबा यांनी इथे राज्याचे मुख्य केंद्र उभारण्याचे ठरवले आणि हा किल्ला बांधायला घेतला. त्याचे नामकरण माहीम असे केले. माहीमचा किल्ला नंतर सुलतानाच्या, पोर्तुगिजांच्या व इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यामुळे वेगवेगळ्या राजवटींचा प्रभाव किल्ल्याच्या बांधकामावर पडलेला दिसतो. या किल्ल्याचा दोन एकर परिसर आहे.
कधीपासून किल्ल्याची दुर्दशा?
१९७७साली वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील कसाई खाना इतरत्र हलवण्यात आला, तेव्हा तेथील परिसरातील लोकांनी त्यांचा संसार थेट माहीम किल्ल्यात आणून ठेवला आणि किल्ल्यातच झोपड्या बांधल्या. उघडपणे एका पुरातन वास्तूवर अतिक्रमण होत असताना त्यावेळीचे सरकार आणि स्थानिक प्रशासन हे पाहत राहिले, यावरून हे अतिक्रमण शासनपुरस्कृत होते का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सध्या या किल्ल्यात सुमारे २७५ झोपड्या असून त्यातील काही झोपड्या तीन-तीन मजली आहेत, एखाद्या जाडजूड माणसाला या किल्ल्यातून सरळ चालत जाता येणार नाही, इतकी झोपड्यांची दाटीवाटी या किल्ल्यात निर्माण झाली आहे. या किल्लयाचे बुरूज ढासळत चालले आहेत.
(हेही वाचा मुख्यमंत्र्यांना पुन्हा ‘वर्क फ्रॉम होम’!)
सरकारकडून डोळेझाक
या किल्ल्यातील बेकायदेशीर झोपड्या हटवण्यात याव्यात, त्यांचे पुनर्वसन करून या किल्ल्याची डागडुजी करण्यात यावी आणि तो किल्ला पर्यटनासाठी खुला करावा, अशी मागणी अनेक इतिहासप्रेमी वारंवार करत असतात, त्यानुसार दिपेश अनंत पटवर्धन हेही यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. २०१४ सालापासून पटवर्धन हे मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, अतिक्रमण विरोधी विभाग, पुरातत्व विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई महापालिका यांच्याकडे पत्रव्यवहार करत आहेत. संबंधितांनी त्यांच्या पत्रांना उत्तरेही दिली, पण कुणीही ठोस कारवाई केली नाही. माहीम किल्ल्यातील झोपड्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ९ हजार ६२५ कोटींचा प्रस्ताव पुरातन व वस्तुसंग्रहालय संचालनालय यांनी तयार केला आहे. मात्र तो आजही लालफितीत अडकून पडला आहे, याची आठवणही पटवर्धन यांनी अनेकदा संबंधीत शासकीय विभागांना करून दिली आहे. तरीही सरकारकडून याकडे डोळेझाक होत आहे.
आदित्य ठाकरे तरी लक्ष देणार का?
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच राज्यातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचा शासननिर्णय काढला, त्यावर कार्यवाहीदेखील सुरु झाली, त्यामुळे पुन्हा एकदा माहीम किल्ल्याविषयी आशा पल्लवित झाल्या आहेत. विशेष म्हणजे राज्याचे पर्यटनमंत्री हे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आहेत आणि त्यांनाही ऐतिहासिक वस्तूंविषयी ममत्व आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी माहीम समुद्रकिनाऱ्याचा कायापालट करण्याचे काम हाती घेतले आहे, आता यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माहीम किल्ल्याकडेही त्यांनी लक्ष द्यावे आणि आजवर ज्या मंत्र्यांना जमले नाही तो माहीम किल्ल्या झोपड्यामुक्त करून या किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून दाखवावे, अशी अपेक्षा दिपेश पटवर्धन व्यक्त करत आहेत.
Join Our WhatsApp Community