देशात पहिल्यांदाच अवघ्या 3 फुटांच्या व्यक्तीला मिळालं ड्रायव्हिंग लायसन्स!

145

देशासह जगात कित्येक प्रेरणादायी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. यापैकीच डेहराडून, उत्तराखंड येथे राहणारी केवळ 3 फूट 6 इंच उंची असणारी आयएएस आरती डोगरा या लोकांसाठी आदर्श ठरली आहे. सध्या त्या राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या विशेष सचिवसारख्या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. आता असेच आणखी एक उदाहरण समोर आले आहे. तेलंगणातील फक्त तीन फूट उंचीचे गट्टीपल्ली शिवालाल हे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणारे देशातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.

लायसन्स मिळवणारे देशातील पहिले व्यक्ती

देशात कोणतेही वाहन चालवण्यासाठी लायसन्स आवश्यक आहे. भारत सरकारने परवाना मिळविण्यासाठी वयासह इतर काही अटी व शर्ती विहित केल्या आहेत. मात्र देशात प्रथमच अवघ्या तीन फूट उंचीच्या व्यक्तीला ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आले आहे. गट्टीपल्ली शिवलाल हे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणारे देशातील पहिले व्यक्ती आहेत.

…आणि स्वतःची गाडी घेण्याचा घेतला निर्णय

कुकटपल्ली येथील अवघ्या तीन फूट उंच असलेले रहिवासी आणि ४२ वर्षीय शिवलाल हे सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत होते. यावेळी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शिवलाल यांना गाडी चालवता येत नसल्याने त्यांना प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूकीवर अवलंबून रहावे लागत होते. यावेळी त्यांना लोक टोमणे मारायचे आणि त्याच्याकडे विचित्र नजरेने बघायचे. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होत असे. त्यानंतर शिवलाल यांनी स्वतः गाडी चालवण्याचा निर्णय घेतला.

विशेष ड्रायव्हिंग स्कूल उघडण्याची योजना

शिवलाल ड्रायव्हिंग शिकण्यासाठी अमेरिकेत गेले. ड्रायव्हिंग शिकून परत आल्यावरही भारतात लायसन्स मिळवणं आणि गाडी चालवणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं, पण त्यांनी हार मानली नाही. यावेळी त्यांना हैदराबादमध्ये कार डिझाइन करणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळाली. शिवलाल यांनी त्या व्यक्तीला गाडीत काही बदल करायला लावले. इतकेच नाही तर शिवलाल आता पत्नीला कार चालवायला शिकवत आहे. शहरात एक विशेष ड्रायव्हिंग स्कूल उघडण्याची त्यांची योजना आहे, जेणेकरून त्यांच्यासारख्या लोकांनाही गाडी चालवणं शिकता येईल. त्यांच्या प्रयत्नाने, तेलंगणा सरकारने गीअरशिवाय स्वयं-चालित वाहनांनाही मान्यता दिली आहे.

लिम्का बुकमध्ये नोंद

इतक्या लहान उंचीच्या व्यक्तीला पहिला ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यानंतर शिवलाल यांचे नाव तेलगू बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.