नवी मुंबईत मालमत्ता कर अभय योजनेला 2 महिन्यांची अंतिम मुदतवाढ

129

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकर नागरिकांना दिलासा मिळावा यादृष्टीने 01 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मालमत्ता कर अभय योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेची मुदत वाढविण्याबाबत विविध माध्यमातून करण्यात आलेल्या विनंतीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मालमत्ता कर अभय योजनेस 2 महिने म्हणजेच 31 जानेवारी 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे.

दंडात्मक रक्कमेवर 75 टक्केपर्यंत सूट

मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असून 01 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीकरीता थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर 75 टक्केपर्यंत सूट देणारी थकबाकीदारांसाठी लाभदायी अभय योजना जाहीर करण्यात आली होती. या अभय योजनेस अजून थोडा कालावधी वाढवून मिळावा अशा प्रकारच्या विनंती / सूचना विविध माध्यमांतून बांगर यांच्याकडे करण्यात येत होत्या. त्यास अनुसरून ही 2 महिन्यांची म्हणजेच 31 जानेवारी 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ जाहीर करण्यात आलेली आहे.

(हेही वाचा आदित्य ठाकरे तरी माहीम किल्ल्याला गतवैभव मिळवून देणार का?)

अंतिम मुदतवाढीच्या सुवर्ण संधीचा लाभ

आता 31 जानेवारी 2022 पर्यंत थकबाकीदार नागरिकांनी मालमत्ता कराची संपूर्ण थकित रक्कम अधिक 25 टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास त्यांच्या दंडात्मक रक्कमेवर 75 टक्के सूट मिळणार आहे. तरी नागरिकांनी या अंतिम मुदतवाढीच्या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन 31 जानेवारीपर्यंत न थांबता आजच नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटला भेट देऊन अभय योजनेचा लाभ घ्यावा व शहर विकासास हातभार लावावा, असे आवाहन बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.