परमबीर सिंहांनी नाकारला सरकारचा निलंबनाचा आदेश

114

सध्या विविध गुन्ह्यांत अडकलेले माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात राज्य सरकारने त्यांना पोलिस खात्यातून निलंबित केले. मात्र परमबीर सिंह यांनी त्यांना निलंबित करण्याचा निर्णय न स्वीकारता सरकारला धक्का दिला. ज्येष्ठतेनुसार पोलिस महासंचालकांकडून आलेला हा आदेश आपण स्वीकारणार नाही, असे परमबीर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

हे कारण दिले!

आपण स्वत: पोलिस महासंचालक श्रेणीतील अधिकारी आहोत. हे लक्षात घेता पोलिस महासंचालक आपल्याला निलंबनाचा आदेश देऊ शकत नाही, असे परमबीर सिंह यांचे म्हणणे आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हा आदेश आपल्याला देऊ शकतात, असे परमबीर सिंह यांचे म्हणणे आहे. राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे आहेत. सध्या ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर आहेत. त्यामुळे ते सध्या तरी परमबीर सिंह यांच्या निलंबनाचा आदेश देऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत आता राज्य सरकार कोणते पाऊल उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(हेही वाचा ओमिक्रॉनची दहशत सोलापूरातही, नागरिकांची पळापळ)

परमबीर सिंह अडचणीत आले

परमबीर यांच्या निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर त्यांच्या निलंबनावर शिक्कामोर्तब झाले. देबाशीष चक्रवर्ती समितीच्या अहवालात परमबीर यांनी सेवेतील नियमांचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच ते सेवेतही रुजू न झाल्याचाही त्यांच्यावर ठपका आहे. तसेच माजी मुंबई पोलिस अधिकारी असेलल्या परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचे आणि अॅट्रोसिटीचे गुन्हेही दाखल आहेत. दरम्यान, परमबीर सिंह यांच्याविरोधात ते फरार असल्याचा १७ नोव्हेंबरचा आदेश देण्यात आला होता. तो आदेश कालच अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मागे घेतला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.