राष्ट्रपतींच्या रायगड दौऱ्यापूर्वी शिवप्रेमींचा विरोध, म्हणाले…

161

स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ७ डिसेंबर रोजी किल्ले रायगडला भेट देणार आहेत. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना ते अभिवादन करणार आहेत. राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्वीकारल्यानंतर ७ डिसेंबर रोजी राष्ट्रपती रायगडच्या दौऱ्यावर येणार आहेत. मात्र या दौऱ्यापूर्वी शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान, ७ डिसेंबर रोजी राष्ट्रपती रायगडला भेट देणार असल्याने ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत किल्ले रायगडवर पर्यटकांना येण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आता यावरून वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.

सोशल मीडियावर शिवप्रेमींकडून विरोध

(हेही वाचा – ….म्हणून दुर्गराज रायगडावर पाच दिवस पर्यटकांना बंदी!)

राष्ट्रपती महोदयांच्या दौऱ्याला आमचा विरोध नाही पण किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिकॉप्टर आम्ही उतरु देणार नाही असा पवित्रा येथील शिवप्रेमींनी घेतला आहे. यासह सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रपतींचे हॅलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरवले जाणार आहे, मात्र यावरून सोशल मीडियावर शिवप्रेमींकडून विरोध दर्शविला जात असून संताप व्यक्त केला जात आहे.

२५ वर्षांनंतर शिवरायांच्या पुन्हा अवमान

यापूर्वी रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिपॅड होते. या ठिकाणी हॅलिकॉप्टर उतरताना तसेच उड्डाण घेताना मोठ्या प्रमाणात धूळ, माती, केर कचरा उडतो. ही धूळ, माती होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उडत असल्याने १९९६ ला येथे उपोषण करून हा हॅलिपॅड येथून काढून टाकण्यात आला होता. सुमारे २५ वर्षांनंतर शिवरायांच्या अवमानाचा तोच प्रश्न पुन्हा निर्माण होत असल्याने शिवप्रेमींकडून विरोध केला जात आहे.

म्हणून रायगड पर्यटकांसाठी राहणार बंद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ७ डिसेंबरला किल्ले रायगडला भेट देणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत किल्ला आणि रोपवेदेखील पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे. हा निर्णय सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.