लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आलेली धार्मिक स्थळे उघडण्यात आली आहे. मात्र धार्मिक स्थळावर गर्दी होऊ नये, म्हणून धार्मिक स्थळे विश्वस्तांनी काही नियमावली लावली आहे. अनेक धार्मिक स्थळांवर दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा सुरु करण्यात आली आहे, मात्र या सुविधेचा फायदा उचलून काही जण दर्शनासाठी देण्यात येणा-या बारकोडचा काळाबाजार करीत असल्याचा प्रकार दादर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर बाहेर सुरु असलेला बारकोडचा काळाबाजार करणाऱ्याला अटक करून १३ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
सिद्धिविनायक मंदिर विश्वस्तांकडून ऑनलाइन बुकिंगची सुविधा
कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील सर्व धार्मिकस्थळे दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. या विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी शासनाने निर्बंध ठेवून धार्मिकस्थळे सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र दर्शनाला गर्दी होऊ नये, कोरोना रोखण्यासाठी नियमावलीचे पालन व्हावे म्हणून ठराविक संख्येने भाविक सोडण्याची अट ठेवण्यात आली. त्यासाठी दर्शनाचे बुकिंग ऑनलाइन करण्यात आले. सिद्धिविनायक मंदिर विश्वस्तांनी देखील आपल्या संकेतस्थळावरून ऑनलाइन बुकिंगची सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून दिली.
(हेही वाचा खबरदार! वाहतूक पोलिसांसोबत उद्धटपणे वागाल तर …)
बारकोडची बेकायदा विक्री
ऍप किंवा संकेतस्थळावरून बुकिंग केल्यावर मंदिराच्या प्रवेशद्वारावर दाखविण्यासाठी एक बारकोड मिळतो. हा बारकोड मंदिराच्या प्रवेशद्वारावर स्कॅन करून आतमध्ये प्रवेश दिला जातो. बुकिंग सुरु होताच येथील काही दुकानदार वेगवेगळ्या नावाने बुकिंग करून बारकोड जमा करतात आणि बुकिंग शिवाय मंदिरात येणाऱ्या पर्यटकांना हे बारकोड बेकायदेशीर विक्री करीत असल्याच्या तक्रारी दादर पोलिसांकडे आल्या होत्या. बारकोडची बेकायदा विक्री करून लोकांची फसवणूक करीत असल्याने पोलिसांनी गंभीर दखल घेत दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रवेशद्वारावर बारकोड दाखविण्यासाठी हे विक्रेते भाविकांकडे स्वतःचा मोबाइल देत असत. पोलिसांनी आजूबाजूचे फुल, प्रसाद विक्रेते यांची झाडाझडती घेत १३ मोबाईल जप्त केले आहेत. या गुन्ह्यात सहभाग आढळणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.