कल्याण-डोंबिवली येथे ओमिक्रॉनचा राज्याचा पहिला रूग्ण सापडल्याने राज्यात चिंतेचं वातावरण पसरले आहे. दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेला एक ३३ वर्षीय तरुण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळल्याने दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभाग, राज्य सरकार तसेच प्रशासन सतर्क झालं असून या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.
४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून जमावबंदी
ऑमिक्रॉनचा संसर्ग वाढू नये, अकोला जिल्ह्यात सतर्कता म्हणून नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करावं अस आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, ४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून अकोला जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर प्रसार टाळण्यासाठी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा- राज्यात ओमायक्रोनचा शिरकाव! कल्याण – डोंबिवलीत सापडला पहिला रूग्ण)
जमावबंदी लागू केलेला पहिला जिल्हा
ओमिक्रॉनची दहशत पसरल्याने धोका वाढू नये म्हणून अकोला जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्बंध लागू करण्यात आले आहे. ओमिक्रॉन आढळून आल्यानंतर जमावबंदीसारखे निर्बंध लावणारा अकोला हा पहिलाच जिल्हा आहे. हा धोका रोखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये अकोला जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश निर्गमित केले आहेत.
या कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी
अकोला जिल्ह्यात ४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून शहरी आणि ग्रामूण भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार,या काळात कोणत्याही प्रकारची रॅली, धरणे, आंदोलन, मोर्चा तसेच इतर कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी असणार आहे.