‘साहित्य संमेलनाला खूप शुभेच्छा पण तेथे जाऊन तरी काय करायचे?’

साहित्य संमेलनास विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची अनुपस्थिती

168

नाशिक येथे दिनांक 3 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत कुसुमाग्रज नगरीत 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू असून आज अखेरचा दिवस आहे. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस सुरू आहे. मात्र या संमलेनस्थळी नाशिक दौऱ्यावर येऊनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट न दिल्याचे समोर आले आहे. नाशिक येथील भाजप आमदारांच्या बहिष्कारानंतर विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्यात आलेल्या संमेलनात जाणार नाही अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. “जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे?’ असे फडणवीस म्हणाले.

सावरकरांचा सन्मान नसेल, तर तेथे जाऊन काय करायचे?

यंदा साहित्य संमेलनात वीर सावरकरांचा यथोचित सन्मान करण्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून हा सवाल उपस्थितीत केला आहे. मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण, जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? यासह ते असेही म्हणाले की, या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असो,आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे.

नाव न वापरण्याचा हट्ट कशासाठी?

केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी?, असा सवाल करतानाच नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे नाशिकमध्ये असूनही त्यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवली आहे. इतकेच नाही तर त्यांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

(हेही  वाचा -नवा रेकॉर्ड! देशात निम्मी लोकसंख्या कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन लसवंत)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.