देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऐंशी पार केलेले शरद पवार सत्ता पालटण्याचे काम करतात तेव्हा ते तरुणाईच्या मनावर विराजमान होतात. म्हणूनच वय हा फक्त आकडा आहे, तारुण्याचा निकष मात्र तो ठरू शकत नाही, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राजगुरूनगर (ता. खेड) येथे केले.
यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले, वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून समाधी घेणारे ज्ञानेश्वर, जगाला भक्तीचा मार्ग दाखवणारी संत मंडळी, कर्तत्वाच्या जोरावर देवत्वापर्यंत पोहचणारे छत्रपती शिवाजी महाराज, एक ही लढाई न हरणारे छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्याचा जन्मसिद्ध हक्क सांगणारे लोकमान्य टिळक, ब्रिटिशांना ‘चले जाव’ सांगणारे बापू, हुतात्मा राजगुरू सारखे क्रांतिकारक यांचे कार्य आणि कर्तृत्व तरुणच होते. कोल्हे पुढे म्हणाले, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक आव्हाने तरुणांसमोर होती; पण आपल्या कर्तृत्वाने अनेक क्षेत्र पादाक्रांत करत त्या आव्हानांना ते सामोरे गेले.
माय-बापावर भार टाकू नका
वयाच्या पस्तिशी, चाळीसीपर्यंत जर तरुण माय-बापावर अवलंबून परावलंबी जीवन जगत असाल तर त्याचा काही उपयोग नाही. एखाद्या क्षेत्रात अपयश येत असेल तर दुसरे पर्याय शोधावे; पण चाळिशी उलटेपर्यंत आपला भार मायबापावर टाकू नका.
मुलासह मुलीसारखी जबाबदारी द्या
स्त्रियांच्या बाबतीत तर येणारा काळ महत्त्वाचा ठरणारा आहे. स्त्रियांनी खूप परिवर्तन पाहिले आहेत. आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून एक पाऊल पुढे टाकून जग पादाक्रांत करत आहे. म्हणून आज काळाची कोणती गरज असेल तर मुलाला पण मुलीसारखी जबाबदारी आणि कर्तव्याची शिकवण द्यायला हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संस्कृती जतनातून संस्कार वर्धन केले जाते. म्हणून आजच्या तरुणांना जगाबरोबर स्पर्धा करताना संस्कार जपण्याचे, ते रूजवण्याचे कार्य करावे लागणार आहे.
(हेही वाचा –शिवप्रेमींच्या विरोधानंतर राष्ट्रपती रोप-वेने रायगडावर येणार…)
मांदळे विकास वर्धिनी व राजगुरुनगर रोटरी क्लब आयोजित व्याख्यानमालेत ‘युवक-कालचा, आजचा-उद्याचा’ या विषयावर डॉ. कोल्हे बोलत होते. अध्यक्षस्थानी गणेश जोशी होते. यावेळी विचारपीठावर नंदकुमार मांदळे, डॉ. दिलीप बांबळे, संपत गारगोटे, अजित वाळुंज, जितेंद्र भन्साळी हे उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community