राज ठाकरेंचा नाशिक दौरा लांबणीवर! पुण्यातून होणार महाराष्ट्र दौऱ्याचा ‘श्री गणेशा’

131

नाशिकमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाची सांगता झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याकडे होते. राज ठाकरे सोमवारपासून म्हणजे ६ डिसेंबरपासून नाशिक दौऱ्यावर जाणार होते, मात्र त्यांचा नाशिक दौरा आता आठवड्याभरासाठी पुन्हा लांबणीवर गेल्याचे समजतेय. दरम्यान, महाराष्ट्र दौऱ्याचा पुण्यातून १५ डिसेंबर रोजी ‘श्री गणेशा’ होणार असल्याची माहिती मिळतेय.

प. महाराष्ट्रात मनसेची मोट बांधण्याच्या तयारी

राज ठाकरे आज पुणे आणि नाशिक दौरा करणार होते. मात्र त्यांनी आजचा वेळ काही खाजगी कामासाठी देत असल्याचे सांगून ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत शिवतीर्थावर बैठक बोलावली आहे. यावेळी उपशहराध्यक्ष, नगरसेवक आणि विभागप्रमुखांशी राज ठाकरे साधणार संवाद साधणार आहेत. यानंतर राज ठाकरे पुन्हा १५ आणि १६ डिसेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात राज ठाकरे पुण्यातून करत आहेत. या मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी हजेरी लावणार आहेत. राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्रात मनसेची मोट बांधण्याच्या तयारीत आहेत.

(हेही वाचा- होय, समाजप्रबोधक वीर सावरकर आणि डॉ. आंबेडकर अनेकदा भेटले होतेच!)

आगामी महापालिका निवडणूक रंगतदार होणार!

फेब्रुवारी २०२२ मध्ये नाशिकसह राज्यातील जवळपास १८ महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.यामुळे मुंबईस नाशिक, पुण्यासह अनेक भागात राज ठाकरेंकडून दौरे सुरु आहेत. दरम्यान राज ठाकरे यांनी यंदा नाशिकमध्ये विशेष लक्ष घातले आहे. कारण नाशिक हा मनसेचा गड मानला जात होता, मात्र स्थानिक नेत्यांमधील मतभेदामुळे मनसेने नाशिकची सत्ता गमावली. परंतु राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे भाजपाच्या हाती गेलेली नाशिकमधील मनसेची सत्ता परत मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंकडून नाशिकवर लक्ष केंद्रीत केल्याने आगामी महापालिका निवडणूक रंगतदार होणार असल्याचे संकेत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.