कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने देशाची चिंता वाढवली आहे. देशभरात २१ हून अधिक रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं असून त्यात सर्वाधिक महाराष्ट्रातील आहेत. यामुळे महाराष्ट्रात चिंता व्यक्त केली जात आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ७ जणांना नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे. यात पुणे शहरातील एकाचा तर पिंपरी चिंचवडमधील सहा जणांचा समावेश आहे. नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेली ४४ वर्षीय महिला आणि तिच्यासह दोन मुली, तिचा भाऊ आणि दोन मुली अशा सहा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे. पुणे, पिंपरीत मिळून सहा रुग्ण आढळल्यानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना घाबरू नका, काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. त्यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जात असल्याचं सांगितलं आहे.
परदेशातून आलेल्यांना करणार क्वारंटाइन
परदेशातून आलेल्या नागरिकांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्याची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र याचा पूर्ण खर्च नागरिकांना करावा लागणार आहे. याच बरोबर पालिका कोविड केअर सेंटर मध्ये देखील या नागरिकांनाची क्वारंटाइन व्यवस्था करत आहे. परदेशांतून आलेल्या नागरिकांना सात दिवस क्वारंटाइन करायचे आहे. त्यांना महापालिकेच्या ‘सीसीसी’मध्ये रहायचे नसेल, तर त्यांना हॉटेलमध्ये राहता येणार आहे. त्याची सोय महापालिकेने केली आहे, मात्र याठिकाणी रहायचे असेल तर संबंधित प्रवाशाला स्वत: हा खर्च उचलावा लागणार आहे. कोरोना काळातही अशीच सोय करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आताही सोय करण्यात आली आहे.
(हेही वाचा – परमबीर सिंहांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा! 11 जानेवारीला पुढील सुनावणी)
कोरोनाचे रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर महापालिकेने सर्व ‘सीसीसी’ बंद केले. परंतु बाणेर आणि नायडू हे सुरू ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी अद्यापही काही रुग्णांना उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. मात्र याशिवाय येरवडा येथील संत ज्ञानेश्वर येथील, हडपसर येथील आणि अन्य काही ठिकाणचे ‘सीसीसी’ एका दिवसात सुरू करण्याची तयारी महापालिकेची आहे.
Join Our WhatsApp Community