मुंबै बँक निवडणूक: सर्वच म्हणतात ‘हम साथ साथ है’

121

एरव्ही शिवसेना आणि भाजपचे नेते, पदाधिकारी हे एकमेकांविरोधात रस्त्यावर ठाकलेले असतात, तसेच आरोप-प्रत्यारोप करतात, मात्र मुंबै बॅंकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे लोकप्रतिनिधी हे एकत्र आलेले पहायला मिळत आहे. सर्व राजकीय द्वेष बाजुला ठेवून सर्व विद्यमान संचालक मंडळांनी बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यासाठी सहकार पॅनेलची स्थापना केली आहे. यामध्ये सर्वच राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी असून पुन्हा आपली वर्णी लागावी म्हणून त्यांनी बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यासाठी जुळवून घेतले आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वच पक्षाचे पदाधिकारी हे ‘हम साथ साथ है’ असे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.

…म्हणून बिनविरोध निवड

कोविडमुळे मुंबै बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊ शकलेली नाही. त्यामुळे आता या बँकेच्या संचालक पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या विरोधात कुणीही उमेदवारी अर्ज न भरल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. दरेकर यांनी विद्यमान संचालक मंडळाचे सहकार पॅनेल तयार करत या सर्वांची बिनविरोध निवडणूक घडवून आणण्याचा निर्धार केला आहे. या सहकार पॅनेलमध्ये भाजपचे आमदार प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्याबरोबरच शिवसेना आमदार व खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यात भाजप विरोधात महाविकास आघाडी करणारे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा निवडून येण्याची भीती वाटल्याने त्यांनी बिनविरोध निवडणुकीला पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा महापालिका सभा पुन्हा ऑनलाईनच्या मार्गाकडे?)

१८ जागांवरही बिनविरोध निवड होईल

मात्र, विद्यमान संचालक मंडळांनी बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरु केला असला, तरी शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरल्याची माहिती मिळत आहे. मात्र, संचालक मंडळांच्या म्हणण्यानुसार जरी अर्ज भरला असला तरी निवडणूक अर्ज मागे घेण्याची तारीख २१ डिसेंबरपर्यंत आहे. त्यामुळे संबंधित पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांना सांगण्यात येईल. त्यामुळे सध्या दोन जणांची बिनविरोध झाली असली तर उर्वरीत १८ जागांवरही बिनविरोध निवड होईल. तसेच जो एक स्वतंत्र मतदार आहे, तेथील जागांसाठी दोन अर्ज आले असले तरी त्यासाठी बिनविरोध निवड होण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. या स्वतंत्र मतदार संघामध्ये जे बँकेच्या स्थापनेच्या वेळेचे मतदार आहेत, त्यांना मतदारानाचा अधिकार आहे. ही निवडणूक कोविडच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध घेण्याचा निर्णय घेण्यात आहे. संपूर्ण मुंबईत मतदार असून त्यातील काही ज्येष्ठ आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर त्यांना मतदानासाठी उतरवणे योग्य नसल्याने त्यांचा विचार करता बिनविरोध निवडणूक केली जाईल. जर असे झाल्यास मुंबै बँकेच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारे बिनविरोध निवडणूक होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.