सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतींनीं शंभरी पार केली असताना, नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर येथे एका महिलेच्या घरात तब्बल 12 हजार लीटर पेट्रोल सापडले आहे. तेल कंपन्यांची फसवणूक करुन ही महिला पेट्रोल विकत होती. तिच्यासह आणखी तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक केली तेव्हा या महिलेकडून पेट्रोलचा एवढा मोठा साठा सापडला की त्यातून एक पेट्रोल पंप उघडला जाऊ शकेल. ही महिला हे पेट्रोल ७७ रुपये प्रतिलिटर दराने विकत होती. देशभरात पेट्रोलचे दर 100 रुपयांपेक्षा जास्त असतानाही नागपूरच्या वर्धा रोडवरील खापरी परिसरात पेट्रोलची केवळ 77 रुपये प्रतिलीटर दराने विक्री होत असल्याची माहिती खापरी पोलिसांनी दिली. यामागे एक संपूर्ण संघटित टोळी सक्रिय होती.
असे पकडण्यात आले या महिलेला
नागपूर आणि परिसरातील पेट्रोलियम कंपन्यांच्या डेपोतून बाहेर पडणारे टँकर निर्जन ठिकाणी थांबवून पेट्रोलची चोरी केली जात होती. या व्यवसायात टँकर चालकांचाही सहभाग होता. या व्यवसायाची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली. खापरी येथील सुनसान परिसरात असलेल्या मीना द्विवेदी नावाच्या महिलेच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. महिलेच्या घरातून बॉक्समध्ये भरलेले 12 हजार लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले. एवढ्या मोठ्या साठ्यातून पेट्रोल पंप चालवता आला असता.
एका टँकरमधून शेकडो लीटर पेट्रोलची चोरी
प्राथमिक चौकशीनुसार वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन डेपो आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी डेपो येथून निघणारे टँकर वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी थांबतात. तेथे टँकरचालक पेट्रोल काढून एका टोळीला देत असे. या टोळीला 22 लिटरचा कॅन 1200 ते 1500 रुपयांना विकला जात होता. नंतर ही टोळी तीच पेटी १८०० रुपयांना विकायची. एका टँकरमधून शेकडो लिटर पेट्रोलची चोरी होते. म्हणजेच पेट्रोल चोरांची ही टोळी पेट्रोलियम कंपन्या आणि पोलिसांच्या नाकाखाली रोज हजारो लिटर पेट्रोलची चोरी करत होती. काही ठिकाणी टँकरमधून पेट्रोल चोरल्यानंतर चालक त्यात रॉकेल आणि इतर पदार्थांची भेसळ करायचे.
( हेही वाचा : भारतीय लष्कर ध्वज दिन, जाणून घ्या ‘या’ दिवसाचे महत्त्व )
Join Our WhatsApp Community