आक्षेपार्ह विधानावरून शेलारांभोवती शिवसेनेचे चक्रव्यूह

140

भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे तक्रारीचे निवेदन सादर केले आहे. तर पेडणेकर यांच्या बाजूने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या उभ्या राहिलेल्या असून त्यांनी या आक्षेपार्ह विधानाबद्दल शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शेलार यांना अडचणीत आणण्याचे चक्रव्यूह शिवसेनेकडून निर्माण करण्याचे प्रयत्न केला जात असतानाच भाजपच्या नगरसेविकांनीही समाज माध्यमांवर मुंबईच्या महापौरांचा अपमान करणारे ट्विट तथा पोस्ट टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत शिवसेनेच्या भक्तांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

नायर रुग्णालयात वरळीतील सिलिंडर स्फोटात भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात दिरंगाई झाल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर तसेच इतर शिवसेनेचे महापालिकेतील पदाधिकारी रुग्णालयात त्यांची प्रकृती जाणून घ्यायला पोहोचले नाही. याबाबत बोलतांना भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या एका विधानावर शिवसेनेने आक्षेप नोंदवला आहे. या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून शेलार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महापौर हे प्रथम नागरीक असून हे पद महत्वाचे आहे. असे असताना शेलार यांनी असे वक्तव्य केले असून या विधानामुळे माझा आणि समस्त स्त्री जातीचा अवमान केला आहे, असे तक्रारीच्या पत्रात म्हटले आहे.

Kishori Pednekar

(हेही वाचा कल्याण-डोंबिवलीकरांची ‘त्या’ 12 जणांनी उडवली झोप)

जे बोललोच नाही त्याचाच प्रसार – आशिष शेलार

मी कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही. ना कोणत्या महिलांबद्दल, ना माननीय महापौर महोदयांबद्दल. माझी संपूर्ण पत्रकार परिषद न पाहताच ज्यांना कुठेच काही मिळत नाही, ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सार्वजनिक आयुष्यात नीतीमूल्य आणि नीतीमत्ता पाळणारा मी आहे, शिवसेनेसारखा पाखंडी आणि खोटे पसरवणारा नाही. खोटे बोलणे आणि अपप्रचार ही भाजपची भूमिका नाही. जर कुठे तक्रार केली असेल, तर त्यातून सत्यच समोर येईल. माझी महापौरांना विनंती आहे की, मी जे बोललोच नाही, तेच तुमचेच समर्थक सोशल मीडियावर लिहित आहेत, पसरवत आहेत. या बदनामीपासून तुम्हीच आता वाचायला हवे, असेही आमदार अँड आशिष शेलार पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.

भाजप म्हणते, महापौरांचा अपमान म्हणजे मुंबईकरांचा अपमान

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या मुंबईच्या प्रथम नागरिक आहेत. त्यांचा अपमान म्हणजे मुंबईकरांचा अपमान आहे. अशावेळी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे, चुकीचा अर्थ काढणारे पोस्ट / ट्विट हे समाज माध्यमांवर व ट्विटरवर काहीजण जाणून बुजून पसरवत आहेत.

प्रत्यक्ष पत्रकार परिषदेत भाजपा नेते आमदार आशिष शेलार हे जे बोलले ते यु ट्युब वर उपलब्ध आहेच. आणि त्याचा अर्थ सुस्पष्ट असतानाही वस्तुस्थितीचा विपर्यास करून वक्तव्याची तोडमोड करून नका, ते वक्तव्य महापौरांशी जोडून महापौरांचा अपमान काहीजण जाणूनबुजून करीत आहेत. आशिष शेलार यांनी केलेली टीका ही सत्ताधारी शिवसेनेतील सर्वच पदसिद्ध अध्यक्ष व पदाधिकारी यांच्याबाबत आहे. ती कोणाही एका व्यक्तीबाबत नाही. आणि त्यांनी दुसऱ्याच वाक्यात त्यांना नक्की काय म्हणायचं आहे, याबाबत सुस्पष्ट खुलासा केलेला आहेच. परंतु यानंतरही व्हिडिओमधील विशिष्ट तुकडाच विचारात घेऊन वस्तुस्थितीचा विपर्यास करीत मुंबईच्या महापौरांचा अपमान काहीजण समाज माध्यमांवर करीत आहेत. तरी याबाबत आपण वस्तुस्थिती तपासून या अफवा व विपर्यास करणारे पोस्ट्स / ट्विट पसरविणाऱ्या व्यक्तींवर योग्य कलमाखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुंबई कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त विश्वास नांगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. भाजप नगरसेविका रिटा मकवाना, राजेश्री शिरवडकर, समीता कांबळे, शीतल गंभीर, नेहल शाह, सारिका पवार, योगिता कोळी, जागृती पाटील, हेतल गाला, रेणू हंसराज, स्वप्ना म्हात्रे, आशा मराठे आदींच्या स्वाक्षरींने हे निवेदन देण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.