कफ परेड पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल
भूपेंद्रसिंग ओमप्रकाश टोकस (३१) असे या जवानाचे नाव आहे. जवान मूळचा राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील हरशोली गावात राहणारा असून त्याची पोस्टिंग लुधियाना युनिट या ठिकाणी होती. पेट्रोलियम तंत्रज्ञानाचा कोर्स करण्यासाठी भूपेंद्रसिंग हा गेल्या महिन्यात मुंबईत आला होता. तो कुलाब्यातील नेव्ही नगर येथे राहत होता. ३० नोव्हेंबर रोजी तो कुणालाही काही न सांगता नेव्ही नगरमधील आर्मी युनिटमधून निघून गेला होता. तो रात्री परत न आल्यामुळे, तसेच त्याचा मोबाईल बंद असल्यामुळे अखेर कफ परेड पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
(हेही वाचा ‘या’ धरणाचे पाणी पित असाल, तर…सावधान! ‘हे’ धरण सर्वाधिक प्रदूषित)
सहा दिवसांपासून बेपत्ता
भूपेंद्रसिंग बेपत्ता झाल्यापासून ६ दिवसांनी कफ परेड पोलिसांना भूपेंद्रसिंग यांचा मृतदेह वसई येथे मिळाल्याची माहिती देण्यात आली. वसई रेल्वे पोलिसांना ५ डिसेंबर रोजी भूपेंद्रसिंग यांचा मृतदेह वसई रेल्वे स्थानकाजवळील ट्रॅकजवळ मिळाला. जवानाचा मृत्यू अपघाती वाटत होता. ‘तो सहा दिवसांपासून बेपत्ता असल्याने आम्ही सर्व बाजूंनी तपास करू. त्याने त्याचा नंबर बंद केला होता. त्याने काही काळ दुसरे सिमकार्ड वापरले, पण तेही बंद केले’, असे पोलिस सूत्राने सांगितले. भूपेंद्रसिंग हा विवाहित होता आणि त्याला दोन लहान मुली आहे, त्याने नेव्ही नगरमधील युनिट सोडताना कुणालाही काही कल्पना दिलेली नव्हती, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली.