मुख्यमंत्र्यांच्या वांद्र्यात अजगराला मांडूळ बनवून तस्करी!

190
रविवारी वांद्रे येथील भाभा उपनगरीय पालिका रुग्णालयानजीकच्या खासगी रुग्णवाहिकेतील गोणीत साप आढळून आला. वांद्रे पश्चिम येथील पोलिसांनी ‘वापरा’ या प्राणीप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकाच्या मदतीने सापाची सुटका केली असता अजगराला मांडूळ बनवून तस्करी सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार दिसून आला. घटनास्थळी सापाजवळ कोणीच दिसून न आल्याने या संपूर्ण प्रकरणातील गौडबंगाल तीन दिवस उलटूनही अद्यापही अधांतरीतच आहे. ही जागा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असल्याने वनविभागाचा अतिरिक्त कारभार पाहणारे वन्यप्रेमी मुख्यमंत्री या प्रकरणाची काय चौकशी करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

‘वापरा’ संस्थेची मदत

‘वापरा’ या प्राणीप्रेमी संस्थेचे प्रमुख सिद्धार्थ कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या नियंत्रणकक्षाला एका निनावी माणसाने या घटनेची आणि तस्करीची माहिती दिली. भाभा रुग्णालयातील खासगी रुग्णवाहिकेत साप ठेवल्याची माहितीही देण्यात आली. त्यानुसार घटनास्थळी पोलिसांनी सापाच्या रेस्क्यूसाठी ‘वापरा’ संस्थेची मदत घेतली. गोणीत ठेवलेल्या सापाला पाहिल्यानंतर काळ्या रंगाचा इंडियन रॉक पायथोन ही अजगराची प्रजाती ‘वापरा’ संस्थेच्या स्वयंसेवकांना आढळली.

तस्करांनी घडवला अपघात

अजगराच्या संपूर्ण शरीरावर काळ्या रंगाचा स्प्रे मारुन त्याच्या शेपटीकडचा अंदाजे एक फूटाचा भाग कापून सुई-दोर्‍यानं शिवण्यात आल्याची माहिती कांबळे यांनी दिली. त्यात या नर अजगराचं लिंगच बाहेर आले आहे. अजगर पकडल्याची माहिती वनविभागाला दिली व या अजगराला ठाण्यातील वनविभागाच्या कार्यालयात नेले. या दरम्यान सिद्धार्थ कांबळे आणि यश या दोन्ही स्वयंसेवकांच्या दुचाकीचा जीवघेणा अपघात झाला. हा अपघात तस्करीकरांनीच केल्याचा संशय व्यक्त होत आहे. अपघातात सिद्धार्थ कांबळे या युवकाला गंभीर जखमा झाल्या आहेत.

चौकशीची मागणी

अजगर हा वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार, पहिल्या वर्गवारीत सुरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे या तस्करीची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी वन्यप्रेमींनी केली. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत पोलिसही गुन्हा दाखल करु शकतात. आमचं पोलिसांशी बोलणं झालं आहे. अजगर आम्ही ताब्यात घेतला असून त्याच्यावर उपचार व्यवस्थित सुरु असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक वनविभागाचे मुंबई विभागाचे वनक्षेत्रपाल राकेश भोईर यांनी दिली.

अजगर आला कुठून? 

गेल्या तीन वर्षांत मेट्रो तीनच्या कामामुळे दादर, माहिम, वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुलात अजगर जमिनीतून बाहेर येत आहेत. या ठिकाणी अजगराचं नवं आश्रयस्थान तीन-चार वर्षांत मुंबईतील वाढत्या पावसामुळे तयार झाल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक देत आहेत. पाण्याच्या वेगानं अजगरासारखे सरपटणारे प्राणी आरे नॅशनल पार्कच्या जंगलातून मानवी वस्त्यांकडे येऊ लागले आहेत. त्यात उंदीर, घूस हे अजगरांचे खाद्य सहज उपलब्ध होत आहे. मात्र काळ्या रंगाचा इंडियन रॉक पायथोन सहसा सापडत नाही. त्याला नजीकच्या परिसरातूनच तस्करीसाठी पकडण्यात आल्याची शंका व्यक्त होते आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.