भूमिगत कचरा पेट्यांचे वाजले बारा!

126

मुंबईत प्रायोगिक तत्वावर चार ठिकाणी भूमिगत कचरा पेट्या बसवण्यात आल्यानंतर मुंबईत ४० ठिकाणी अशा प्रकारच्या अत्याधुनिक पध्दतीच्या भूमिगत कचरा पेट्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व ४० कचरा पेट्यांचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु त्यानंतर वाढीव तीन महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर कोविडचे आगमन झाले. पण कोविडनंतर पुन्हा सर्व विकासकामे सुरळीत झाल्यानंतरही आजतागायत भूमिगत कचरा पेट्यांचे टार्गेट प्रशासनाला पूर्ण करता आले नाही. या ४० पैकी केवळ १२ कचरा पेट्याच उभारता आल्याने हे मिशन पूर्ण करता करता प्रशासनाचेच बारा वाजले आहेत.

सन २०१९च्या प्रारंभी मुंबईत चार ठिकाणी प्रायोगिक तत्वावर भूमिगत कचरा पेट्या बसवण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात प्रस्ताव मंजुरीनंतर या कामाकडे कंत्राटदार आणि विभागाने दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. मुंबईत ४० भूमिगत कचरा पेट्या उभारणीचा प्रस्ताव सप्टेंबर २०१९ला मंजूर झाल्यानंतर पुढील तीन महिन्यांमध्ये या पेट्यांचे काम होणे अपेक्षित होते. पण आजतागायत हे काम झालेले नाही.

नागरिकांना होणारा त्रास कमी होईल

मुंबईत अनेक सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे डबे ठेवण्यात आले. या सार्वजनिक ठिकाणच्या उघड्यावरील कचऱ्याची आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरते. तसेच उघड्यावरील या कचरा पेट्यांमधील कचरा मोकाट जनावरे तसेच कचरा वेचकांमुळे बाहेर फेकला जातो. त्यामुळे कचरा पेटीचा परिसर अस्वच्छ होऊन त्याठिकाणांहून चालतांना पादचाऱ्यांना तसेच नागरिकांना नाकाला रुमाल लावून चालावे लागते. त्यामुळे अत्याधुनिक पध्दतीच्या भूमिगत कचरा पेट्या बसवल्यास कचऱ्याची दुर्गंधी, अस्वच्छता तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. या विचाराने महापालिकेने प्रायोगिक तत्वावर ए, डी, पी/उत्तर व आर/मध्य या चार विभागात प्रत्येकी एक याप्रमाणे आधुनिक भूमिगत स्वरुपाचे २.२ घनमीटर क्षमतेचे डबे बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते डबे बसवण्यातही आले. यातील ग्रँटरोड येथील एका भूमिगत कचऱ्याच्या पेटीचे लोकार्पण फेब्रुवारी २०१९ मध्ये युवासेना अध्यक्ष व विद्यमान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व तत्कालिन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते झाले होते.

( हेही वाचा : भाजप म्हणते, कोस्टलमध्ये ६५० कोटींचा घोटाळा! शिवसेना म्हणते एकत्र बसून ठरवा आकडा! )

४० भूमिगत कचरा पेट्यांना मान्यता

चार ठिकाणी बसवण्यात आलेल्या या भूमिगत कचरा पेट्यांच्या यशस्वी प्रयोगानंतर महापालिकेच्या उर्वरीत २० विभागांमध्ये ४० ठिकाणी आधुनिक स्वरुपाचे २.२ घनमीटर क्षमतेचे कचरा डबे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबतचा प्रस्ताव सप्टेंबर २०१९मध्ये स्थायी समितीने मंजूर करून दिला. यासाठी सुमारे १० लाख रुपये प्रत्येक कचरा पेटीमागे खर्च गृहीत धरुन ४० भूमिगत कचरा पेट्यांसाठी ४ कोटींच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली होती. त्यानंतर पुढील तीन महिन्यांमध्ये या कचरा पेट्या बसवण्यात येतील, अशी प्रशासनाच्यावतीने माहिती देण्यात आली होती.

कोविडचा आजार मार्च २०२० पसरला असला तरी त्यापूर्वी म्हणजे डिसेंबर २०१९रोजी या कचरा पेट्या उभारणीचा कालावधी संपुष्टात आला होता. मात्र डिसेंबर २०१९पर्यंत एकही कचरा पेटी उभारण्यात आली नव्हती, तर डिसेंबर २०२१ पर्यंत ४० कचरा पेट्यांपैकी मुंबईतील १२ ठिकाणीच कचरा पेट्या उभारण्यात आल्या असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

मोटेंचा सहभाग मोठा

मुंबईत प्रायोगिक तत्वावर केलेल्या चार भूमिगत कचरा पेट्यांसह उर्वरीत ४० ठिकाणांपैकी केवळ १२ अशाप्रकारे एकूण १६ ठिकाणी अत्याधुनिक भूमिगत कचरा पेट्या उभारण्यात आल्या आहे. यामध्ये ग्रँटरोड येथे प्रायोगिक तत्वावर अशा प्रकारची कचरा पेटी उभारण्यात डी विभागाचे तत्कालिन सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त असताना त्यांनी जुहू चौपाटीवरही अशा प्रकारच्या कचरा पेटीची उभारणी केली होती. आणि करनिर्धारण व संकलन विभागाचे काम पाहताना एम पश्चिम विभागाच्या सहायक आयुक्त पदाचा प्रभारी भार पाहताना चेंबूर पूर्व येथे मागील महिन्यात भूमिगत कचरा पेटीची उभारणी केली होती. यासंदर्भात उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. संगीता हसनाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भूमिगत कचरा पेट्यांबाबत आपण आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.