विदर्भातील संत्रा बागा नामशेष होणार ?

141

आपल्या आगळ्यावेगळ्या चवीने सर्व जगात वैशिष्ट्यपूर्ण ओळख मिळवलेल्या नागपुरी संत्र्याला जगभरातून मोठी मागणी असते. परंतु गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे संत्रा उत्पादक बागायतदार डबघाईस आले असून संत्र्यावर वाढलेला रोगाचा प्रादुर्भाव,दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणारी फळगळ दिवसागणिक वाढलेला उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने जीवापाड जपून वाढवलेली हिरवीगार संत्रा झाडे तोडण्याची वेळ युवा शेतकऱ्यावर आली.

म्हणून तोडली झाडे 

मोर्शी तालुक्यातील येरला येथील राजेंद्र बाबाराव जगाते या युवकाने आपल्या चार एकर शेतीमध्ये संत्रा झाडाची लागवड केली होती. विहिरीला अपुरे पाणी असल्याने संत्रा झाडे जगवण्याकरता सूक्ष्म सिंचन,प्लास्टिक मल्चिंग फिल्मचे आच्छादन, सात किलोमीटर अंतरावरील अप्पर वर्धा धरणातून लिफ्ट इरिगेशन इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या कष्टाने संत्रा झाडे उभी केली होती. परंतु संत्राची अकाली होणारी फळगळ,विजेचा अनियमित पुरवठा,पावसाचा लहरीपणा या सर्व बाबींना कंटाळून राजेंद्र जगाते या शेतकऱ्याने १४ वर्षे पोटच्या पोरासारखी वाढवलेली हिरवीगार झाडे तोडण्यास सुरुवात केली. राजेंद्र जगाते यांनी सुरुवातीला ६५० संत्रा झाडे लावली होती. संत्राचे अनियमित उत्पन्न आणि उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ न बसल्याने दोन वर्षांपूर्वी त्यांनी दोनशे झाडे काढून टाकली. तरीसुद्धा उर्वरित ४५० झाडांपासून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने आता त्यांनी सर्वच ४५० झाडे जेसीबीच्या साह्याने मुळासकट काढणे सुरू केले आहे.

विदर्भातील कॅलिफोर्निया नामशेष होणार का

अप्पर वर्धा धरणातून सात किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकून आणलेले पाणी,विजेच्या अनियमित त्यावर मात करण्याकरता डिझेल जनरेटरचा वापर व सर्व तंत्रज्ञानाचा उपयोग करताना आपले उत्पादन व उत्पन्न वाढावे हा उद्देश सफल होत नसल्याने शेवटी छातीवर दगड ठेवून त्यांना हा निर्णय घ्यावा लागला.गेल्या काही दिवसांपूर्वी चांदूर बाजार तालुक्यातील एका शेतकऱ्यांने अशीच आपल्या संत्रा बागेतील हिरवीगार संत्रा झाडे काढून टाकली होती.जगाते यांची हिरवे झाड काढताना पाहून परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील हिरवी संत्रा झाडे काढून टाकण्याच्या मानसिकतेत असल्याचे चित्र  दिसत आहे. त्यामुळे विदर्भातील कॅलिफोर्निया नामशेष होणार का ? हा प्रश्न उद्भवतो.

एनआरसीसीसारख्या संस्था म्हणजे पांढरा हत्ती

कृषी विद्यापीठ,कृषी विभाग व एनआरसीसी सारख्या वर्षाला कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या संस्था जर शेतकऱ्याच्या कामात येत नसतील तर त्या संस्थांवरील होणारा शासनाचा खर्च व्यर्थ जात आहे असेच म्हणावे लागेल.आपल्या शेतातील हिरवीगार झाडे काढून टाकण्याचा निर्णय शेतकऱ्यांना घ्यावा लागणे ही भविष्यातील मोठ्या संकटाची नांदी असून याची शासनाने व राज्य व केंद्रीय कृषी मंत्रालयाने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.

 ( हेही वाचा : लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमागे ‘ही’ असू शकतात कारणे! काय म्हणतात संरक्षण तज्ज्ञ? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.