मुंबईतील २२१ रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे ११ टक्के तर ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे ८९ टक्के रुग्ण आढळले आहेत. तसेच, ओमायक्रॉन या नवीन प्रकाराचे फक्त २ रुग्ण (संकलित नमुन्यांच्या संख्येत १ टक्क्यांपेक्षाही कमी) आढळले आहेत. तसेच या संकलित २२१ नमुन्यांपैकी एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगर) सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार, कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण चाचणी उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत आहे. विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्याने, एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते. कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार अद्यापही समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे महानगरपालिका आरोग्य प्रशासनाला शक्य झाले आहे.
२७७ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी
मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या पाचव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण २७७ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील २२१ रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. मुंबईतील २२१ रुग्णांपैकी १९ रुग्ण (९ टक्के) हे शून्य ते २० वर्षे आतील वयोगटातील आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटात ६९ रुग्ण (३१ टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगटात ७३ रूग्ण (३३ टक्के), ६१ ते ८० वयोगटात ५४ रुग्ण (२५ टक्के) आणि ८१ ते १०० वयोगटातील ६ रुग्ण (३ टक्के) यामध्ये समाविष्ट आहेत.
चाचणीतील निष्कर्षात काय दिसले?
२२१ पैकी २४ रुग्ण (११ टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअंट’, तर १९५ रुग्ण (८९ टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर उर्वरित दोघे जण ओमायक्रॉन या नवीन प्रकारच्या विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. एकूण संकलित नमुन्यांच्या संख्येच्या तुलनेत त्याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. मुंबईत दोन ओमायक्रॉन बाधित असल्याचे यापूर्वीच जाहीर केले असून तेच हे रुग्ण आहेत, त्यात वाढ नाही. या ओमायक्रॉन बाधितांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या निकटवर्तीयांची देखील कोविड चाचणी केली असता त्यातही कोणालाही कोविड बाधा झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महानगरपालिका प्रशासन सर्वतोपरी दक्षता घेत आहे. असे असले तरी, ओमायक्रॉन विषाणू अत्यंत वेगाने प्रसारित होणारा असल्याने नागरिकांनी देखील गाफील न राहता कोविड प्रतिबंधक वर्तन कायम ठेवले पाहिजे. डेल्टा व्हेरिअंट आणि डेल्टा डेरिव्हेटीव्ह या दोन्ही प्रकारातील कोविड विषाणू तुलनेने सौम्य त्रासदायक असून त्यापासून तितकासा गंभीर धोका संभवत नाही. डेल्टा व्हेरिअंट समवेत तुलना केल्यास, डेल्टा डेरिव्हेटीव्ह विषाणू संक्रमण तसेच प्रसार वेग देखील कमी असल्याचे आढळले आहे. असे असले तरी कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.
( हेही वाचा : बापरे! दूषित पाणी मिसळलेल्या दुधाचा वापर )
मास्क लावणे बंधनकारक
चाचणीचे निष्कर्ष पाहता, कोविड लसीकरण वेगाने केल्याचा प्रभाव म्हणून मुंबई महानगरातील कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट होत आहे. असे असले तरी नवीन ओमायक्रॉन विषाणू प्रकाराचा वेगाने प्रसार होण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला इशारा लक्षात घेता, सर्वांनी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे पालन यापुढेही कठोरपणे करणे आवश्यक आहे. सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीकरण पूर्ण करुन घेणे देखील आवश्यक आहे.
Join Our WhatsApp Community