जगभरातील नागरिकांच्या मानवाधिकारांप्रती जागरुकता निर्माण करण्यासाठी १९५० सालापासून १० डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. मानवाधिकार दिवस म्हणजे आपल्याला माणूस म्हणून स्वतःमध्ये डोकावण्याची आणि माणसाच्या अंगभूत प्रतिष्ठेला उंची देण्यासंदर्भात आपली भूमिका तपासून पाहण्याची संधी आहे. आपल्या हक्कांमध्ये आपली जबाबदारीही समाविष्ट असते, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. ते आज, शुक्रवारी नवी दिल्लीत मानवाधिकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात बोलत होते.
समानता म्हणजे मानवी हक्कांचा आत्मा
‘समता’ ही या वर्षीच्या मानवाधिकार दिनाची संकल्पना आहे. सर्व मानवांना समान प्रतिष्ठा आणि हक्क जन्मजात प्राप्त होतात, असे मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यातील पहिल्या प्रकरणात म्हटले आहे. समानता म्हणजे मानवी हक्कांचा आत्मा होय. म्हणूनच माणसाची प्रतिष्ठा जपण्यासाठीची पहिली अट म्हणजे भेदभावाला थारा न देणे, असे असतानाही जगात असंख्य प्रकारचे भेदभाव अस्तित्वात आहेत. त्यामुळे दुर्देवाने प्रत्येकाच्या अंगभूत क्षमतांचे आकलन होत नाही व समाजाचे हित साधण्यातही बाधा येते, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्पष्ट केले.
( हेही वाचा : संपकरी एसटी कर्मचारी ‘या’ दिवशी होणार बेरोजगार! )
एकत्रितपणे विचार विनिमय करणे
मानवाधिकार दिन म्हणजे आपण सर्वांनी एकत्रितपणे विचार विनिमय करणे व मानवाच्या प्रगतीला खीळ घालणाऱ्या पूर्वग्रहांवर मात करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करणे यासाठी सुयोग्य संधी असल्याचेही राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community