भूमिगत कचरा पेट्या अडकल्या युटीलिटीजच्या जाळ्यात!

118

मुंबईत अत्याधुनिक भूमिगत कचरा पेट्या बनवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असला, तरी प्रत्यक्षात या कचरा पेट्यांचे लक्ष्य त्यांना गाठताच आले नाही. मात्र, हे लक्ष्य गाठता न येण्यामागील प्रमुख कारण हे पदपथांखालून जाणाऱ्या युटीलिटीज. महापालिकेने मुंबईत ४० भूमिगत कचरा पेट्या बनवण्याचा निर्णय घेत याचे कंत्राट मंजूर केले असले, तरी प्रत्यक्षात यासाठी कोणत्याही प्रकारे जागाच निश्चित करण्यात आली नव्हती. त्यामुळे आधी जागेची उपलब्धता नसणे आणि त्यातच पदपथांखालून युटीलिटीज जात असल्याने त्याच्या जाळ्यात या कचरा पेट्या अडकल्या असल्याची माहिती मिळत आहे.

युटीलिटीजमुळे अडथळा

मुंबई महापालिकेने मुंबईतील विविध ४० भूमिगत कचरा पेट्या निर्माण करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली होती. परंतु आजमितीस महापालिकेला केवळ १२ ठिकाणीच या कचरा पेट्या बनवता आल्या आहेत. महापालिकेने यासाठी निविदा मागवून कंत्राटदाराची निवड करताना कोणत्याही प्रकारची जागा निश्चित केली नव्हती. त्यामुळे कंत्राटदाराची निवड केल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाने जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुंबईतील २४ विभाग कार्यालयांना पत्र पाठवून जागेचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी पदपथांखालून जाणाऱ्या युटीलिटीजमुळे या कचरा पेट्या उभारणीत मोठा अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे महापालिकेने समुद्र चौपाटीजवळ किंवा रुग्णालयांच्या परिसरांमध्ये अशा प्रकारच्या कचरा पेट्या उभारल्या आहेत. समुद्र चौपाट्यांवर या पेट्या उभारणे आवश्यक असले तरी सीआरझेडमुळेही तिथे उभारण्यात अडचणी येत असल्याचे काही विभागीय सहायक आयुक्त तसेच घनकचरा व्यवस्थापनातील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्व उपनगरांत शिवसेना नगरसेविका सुवर्णा करंज यांच्या प्रभागात सर्व प्रथम भूमिगत कचरा पेटी बसवण्यात आली, तर चेंबूरमध्ये आतापर्यंतची शेवटची कचरा पेटी बसवण्यात आली आहे. मुंबईत ए, डी, मालाड आणि बोरीवली आदी भागांमध्ये सर्वात प्रथम कचरा पेटी प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आल्या होत्या.

( हेही वाचा : महापालिका कर्मचाऱ्यांनाही येतोय महापालिका रुग्णालयांचा वाईट अनुभव! )

जागा निश्चित न करता कंत्राटदाराची नेमणूक का केली?

महापालिकेने प्रथम चार ठिकाणी भूमिगत कचरा पेट्या बनवल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ४० ठिकाणी बनवण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली होती. त्यामुळे महापालिकेने जागा निश्चित न करता आधीच कंत्राटदाराची नेमणूक का केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जागा उपलब्ध होत नसल्याने या कचरा पेट्यांची उभारणी होत नाही. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यानुसार निविदा काढली होती, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार भूमिगत कचरा पेट्या या पदपथांवरच बसवणे आवश्यक आहे. परंतु पदपथावर या कचरा पेट्या बसवता येत नसल्याने नव्याने निर्माण होणाऱ्या गृहनिर्माण वसाहतींच्या परिसरांमध्ये अशा प्रकारच्या कचरा पेट्या बसवणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.

आतापर्यंत बसवण्यात आलेल्या १२ भूमिगत कचरा पेट्या

  1. ए /वॉर्ड : कुलाबा
  2. ई /वॉर्ड : नायर रुग्णालय
  3. ई/ वॉर्ड : नायर रुग्णलय
  4. एम/ पूर्व : चेंबूर पूर्व
  5. के /पश्चिम : जुहू चौपाटी
  6. के /पश्चिम : जुहू चौपाटी
  7. एस/ वॉर्ड : कांजूर मार्ग मयुर गार्डनसमोर
  8. एस /वॉर्ड : कांजूर मार्ग, मयूर गार्डनसमोर
  9. एस /वॉर्ड : कांजूरमार्ग, मयुर गार्डनसमोर
  10. आर /दक्षिण : के डी कंपाऊंड
  11. आर /दक्षिण : के डी कंपाऊंड
  12. राणीबाग
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.