बेकायदेशीररित्या मुंबई शहरात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिक महिलेची तक्रार करून देखील मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली नसल्याच्या आरोपावरून राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक देवेन भारती, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त दीपक फटांगरे आणि रेश्मा खान यांच्याविरुद्ध मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययु) कडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. मुंबईचे तत्कालीन सह पोलिस आयुक्त (कावसु) देवेन भारती यांच्या सांगण्यावरून या महिलेवर गुन्हा दाखल झाला करण्यात आला नव्हता, अशी माहिती समोर आली आहे.
रेश्मा खान हिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले
या प्रकरणातील तक्रारदार दीपक कुरुळकर हे सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक आहेत. ४ वर्षांपूर्वी कुरुळकर हे मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा येथे कार्यरत असतांना मालवणी येथे बेकायदेशीर राहणाऱ्या रेश्मा खान हिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते, चौकशी दरम्यान विशेष शाखेच्या पोलिसांना रेश्मा हिच्याकडे एक पासपोर्ट मिळाला होता. रेश्माने हा पासपोर्ट बनवण्यासाठी सादर केलेले सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे विशेष शाखेच्या चौकशीत उघडकीस आले होते. रेश्मा ही बांगलादेशी नागरिक असून मुंबईत बेकायदेशीररित्या राहत होती, भारतीय नागरिक असल्याचे भासवण्यासाठी तिने बोगस कागदपत्राच्या आधारे पासपोर्ट बनवला होता, असे समोर येताच विशेष शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक दीपक कुरुळकर यांनी तिच्याविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून मालवणी पोलिस ठाण्याला सर्व पुरावे सादर करून रेश्मा हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची विनंती केली होती.
(हेही वाचा एसटीच्या संपावरून पडळकरांनी केला गंभीर आरोप, म्हणाले…)
चार वर्षानंतर प्रकरणात कारवाई नाही
दिपक फटांगरे हे त्यावेळी मालवणी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते, या तक्रारीनंतरही दिपक फटांगरे यांनी काहीही कारवाई केली नव्हती. काही दिवसांनी कुरुळकर यांनी मालवणी पोलिसांना अर्ज करून रेश्मा खान या महिलेवर काय कारवाई करण्यात आली ही विचारणा करण्यात आली असता वरिष्ठांच्या आदेशावरून ही कारवाई झाली नसल्याचे त्यांना समजले. मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे तत्कालीन सह पोलिस आयुक्त देवेन भारती यांनीच मालवणी पोलिसांना कारवाई करू नये, असे आदेश दिल्याची माहिती कुरुळकर यांना कळाली. विशेष शाखेच्या आय ब्रँच मध्ये कुरुळकर कार्यरत असताना देवेन भारती यांनी त्यांना बोलावून या प्रकरणात जास्त लक्ष घालू नकोस, असे सांगितले होते. दिपक कुरुळकर यांनी निवृत्तीनंतर देखील या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. माहितीच्या अधिकाराखाली कुरुळकर यांनी या कारवाईबाबत माहिती मागवली होती, मात्र चार वर्षानंतर देखील या प्रकरणात कुठलीही कारवाई झाली नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले. कुरुळकर यांनी मालवणी पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार करून देवेन भारती, दिपक फटांगरे आणि रेश्मा खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या अर्जाची चौकशी करून मालवणी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या तिघांवर बोगस दस्तावेज सादर करून फसवणूक करणे, पासपोर्ट कायदा तसेच विदेशी नागरिक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे सोपविण्यात आला आहे. रेश्मा खान ही एका राजकीय पक्षाच्या नेत्याची पत्नी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community