…तर राहुल गांधींच्या मुंबईतील सभेवरही बंदी आणणार का? असदुद्दीन ओवैसींचा सवाल

94
एमआयएमच्या तिरंगा रॅलीला विरोध केला, १४४ कलम लावले, ओमायक्रोनचे कारण दिले, आता हीच कारणे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेसाठी देत बंदी आणणार का? त्यांचीही मुंबईत २६ डिसेंबरला सभा होणार आहे, असा सवाल एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केला. ओवैसींच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मुस्लिम आरक्षणाच्या विषयावर चांदिवली येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

 

राहुल गांधी मुंबईत येतील, तेव्हा कोणताही ओमायक्रोन नसणार, १४४ लागणार नाही, या ओमायक्रॉनमुळे महापालिका निवडणूक थांबवणार आहेत का?, महाराष्ट्रात किती जिनोम सीक्वेंसी केले आहे?, किती जणांचे लसीकरण केले?, याची उत्तरे उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत का? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुस्टर डोस लावायचा कि नाही, यावर अजून निर्णय घेत नाही, पण मी मुसलमानांना बूस्टर डोस लावणारच, असेही ओवैसी म्हणाले.

 

दोन्ही काँग्रेसवाले शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसले!

मुस्लिम आरक्षणाच्या नावावर दोन्ही काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी मोठ्या मोठ्या बाता मारल्या, पण आज सत्तेत आल्यावर ते गप्प बसले आहेत. आज शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवाले एकत्र बसून पोट भरून खात आहेत, त्यांना मुसलमान जेवणाचे ताट वाढून देतोय आणि स्वतः उपाशी राहत आहे. किती दिवस तुम्ही त्यांना निवडून देणार? मी मुंबईत यायचो, तेव्हा हेच दोन्ही काँग्रेसवाले मला फोन करून सांगायचे, ‘येऊ नका नाही तर शिवसेना, भाजपाला फायदा होईल.’ आम्ही गप्प राहिलो, पण नंतर आमच्या पदरात काय पडले? आता तेच दोन्ही काँग्रेसवाले शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसले आहेत, असेही ओवैसी म्हणाले. निधर्मी या शब्दामुळे मुसलमानांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ८३ टक्के मुसलमान भूमीहीन आहेत. यामुळे उद्धव ठाकरे आणि दोन्ही काँग्रेसचे काळीज तडफडत नाही का, असा सवाल करत विधानसभेत ‘मला बाबरी मशीद तोडणाऱ्यांचा अभिमान वाटतो’, असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंची शरद पवारांना भूमिका पटते का? काँग्रेस पक्षात तर एकही नेता उरला नाही, काही दिवसानंतर काँग्रेस पक्ष संपुष्टात येणार आहे’, असेही ओवैसी म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.