आज होणारी म्हाडाची परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांमध्ये संताप

राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत ही माहिती दिली

98

म्हाडाच्या विविध पदांची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा जानेवारीमध्ये होणार असून राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत ही माहिती दिली आहे. यासह जितेंद्र आव्हाड असेही म्हणाले, “सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी म्हाडाची परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जानेवारीत घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी घराबाहेर पडून केंद्रावर जाऊ नये यासाठी इतक्या रात्री ही माहिती देत आहे.”

काय म्हणाले आव्हाड?

म्हाडाच्या परीक्षांच्या संदर्भात काही जणांनी मध्यस्थांना पैसे दिल्याचे माझ्या कानावर आले आहे. तुम्ही ज्याही कोणत्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर ते हक्काने परत घ्या, असे ट्विट देखील आव्हाड यांनी केले आहे. ”म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमचा अधिकार, तुमच्या बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही. माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे. आपल्या घरातले दागिने विकले आहेत. काही जणांनी कर्ज काढले आहेत. माझी या दलालांना नम्र विनंती आहे की हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांचे काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही. पण असे ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत” असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

(हेही वाचा – एमआयएमच्या मोर्च्यात कोरोना नियमांची ऐशी तैशी!)

स्पर्धा परीक्षेतील गोंधळाची परंपरा कायम

आव्हाड यांच्या या ट्विटनंतर त्यावर विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या परीक्षेसाठी पश्चिम महाराष्ट्रातून शनिवारी हजारो विद्यार्थी मुंबई, पुणे,बारामती येथील विविध केंद्रात पोहचले आहेत. आता त्यांना मध्यरात्रीच्या घोषणेमुळे निष्कारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परीक्षा रद्दची घोषणा आधीच केली असती तर नाहक धावपळ, त्रास वाचला असता असा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेतील गोंधळाची परंपरा आजही कायम राहिली आहे.

लीक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना ताब्यात

पुणे सायबर पोलिसांकडून खळबळजनक कारवाई केली आहे. सायबर पोलिसांनी म्हाडाचा पेपर लीक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे, औरंगाबाद आणि पुण्यातून या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. म्हाडाचा आज होणारा पेपर लीक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यासह यासंदर्भातील पोलिसांना काही पुरावेही मिळाले होते, असे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.