कोकणासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या यात्रेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. भराडी देवीच्या यात्रेची तारीख ठरली असून यात्रोत्सव 24 फेब्रुवारीला होणार आहे. या यात्रेला देशासह विदेशातील भाविक आवर्जून उपस्थितीत राहतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाचं सावट असल्याने अनेक निर्बंध होते. परंतु यंदा भाविकांनी ही तारीख ठरल्यानंतर कोकणात जाण्यासाठी रेल्वे बसचे बुकिंग सुरू केले आहे.
देवीला कौल लावल्यानंतर तारीख ठरते
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावाच्या आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी मातेचा ‘यात्रोत्सव आंगणेवाडी’ची यात्रा नावाने प्रसिद्ध आहे. भराडी देवीच्या जत्रेची तारीख कधीही ठरलेली नसते. असे सांगितले जाते की, भराडी देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते. ही तारीख ठरवण्याची प्रथाही आहे. दिवाळीत शेतीची कामे झाली की आंगणेवाडीतील देवीचे मानकरी देवीला कौल लावतात, कौल लावून जत्रेचा दिवस निश्चित केला जातो. एकदा निश्चित झालेली तारीख कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही.
(हेही वाचा- आज होणारी म्हाडाची परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांमध्ये संताप)
कोकणातील सर्वात मोठी यात्रा
कोकणातील सर्वात मोठी यात्रा म्हणून आंगणीवाडीकडे पाहिले जाते. गेल्या दीड दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे या सर्व भक्तांना श्री भराडी मातेचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र यावर्षी सर्व भाविकांना आंगणेवाडीत उपस्थित राहून श्री भराडी देवीचे दर्शन घेता येणार असल्याचे सांगितले जात आहे.