…तर २०२४ साली दिल्लीत चमत्कार होईल!

115

संपूर्ण देशभरात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने जो चमत्कार केला. तसाच चमत्कार सन २०२४ साली दिल्लीत होईल. त्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित व्हर्चुअल रॅली प्रसंगी ते बोलत होते. या व्हर्च्युअल रॅलीत नाशिक जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काय म्हणाले छगन भुजबळ ?

देशात साहित्य, शिक्षण, विज्ञान, कला, क्रीडा यासह विविध महत्वाच्या क्षेत्रात पवार साहेबांचे मोलाचे योगदान आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेले काम जगभरात गाजलं असून कुस्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्याचे काम त्यांनी केलं. कृषी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या विशेष योगदानामुळे आज देश अन्न, धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून फळबाग लागवड क्षेत्रातही अग्रभागी आहे. त्यांच्या या विशेष योगदानामुळे आज जगभरात अन्न, धान्याची फळांची निर्यात आपण करू शकत असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

ते म्हणाले की, आजवर अनेक संकटांना पवार यांनी तोंड दिले आहे. कितीजरी मोठ संकट त्यांच्यासमोर आले तरीदेखील पवार यांचा संयम कधीही ढळणार नाही ही अतिशय विशेष बाब आहे. आज देशभरात जो ओबीसींचा प्रश्न गाजत आहे त्या ओबीसी समाजाला सर्व प्रथम महाराष्ट्रात आरक्षण देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले. राज्यात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासोबत अनेक क्रांतीकारी निर्णय त्यांनी घेतली. त्यामुळे महाराष्ट्र एका उंचीवर पोहचला असल्याचे भुजबळांनी नमूद केले.

( हेही वाचा : आदित्यच्या पावलांवर अमितचे पाऊल! )

त्यांना निवडणुकीत खड्यासारखे बाजूला ठेवा

एकीकडे ज्यांनी सरकारमध्ये असतांना ओबीसींसाठी अध्यादेश काढला त्याच पक्षाचे पदाधिकारी कोर्टात या आरक्षणाला आवाहन देत आहे. यावरून विरोधकांची कथनी एक आणि करणी एक असून “मु मे राम… और बगल छुरी” अशी भूमिका असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

आज ओबीसी आरक्षणाला विरोध होत आहे. उद्या देशातील इतर आरक्षणाला देखील विरोध होईल. आरक्षण काढून टाकण्याचा छुपा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न उधळून लावण्याची सर्व ओबीसीसह इतर नागरिकांची जबाबदारी आहे. तुमच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांना येणाऱ्या निवडणुकीत खड्यासारखे बाजूला ठेऊन त्यांना आपल्या दारात उभं करू नका, असे आवाहन छगन भुजबळांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.