कोरोनाचा नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनच्या प्रादुर्भाव पाहता, पुन्हा एकदा राज्यात निर्बंध लागतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये, उद्याने बंद करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर १४ मार्च २०२० ला कात्रजमधील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय बंद करण्यात आले. या प्राणीसंग्रहालयाला दरवर्षी अनेक पर्यटक आवर्जून भेट देतात. परंतु जवळपास दोन वर्षे महामारीच्या साथीने हे प्राणीसंग्रहालय बंद असल्यामुळे प्रशासनाला आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच अनेक पर्यटक संग्रहालय चालू होण्याची प्रतीक्षा करत आहेत.
आर्थिक नुकसान
एकूण २१ महिन्यांच्या काळात प्राणी संग्रहालयाला तिकीटदराच्या माध्यमांतून मिळणारे उत्पन्न शून्य झाले. त्यामुळे अंदाजे एकूण १० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले असल्याची माहिती प्राणी संग्रहालय प्रशासनाने दिली आहे. पुणे महापालिकेने शहरातील काही उद्याने सुरु करण्याची परवानगी दिलेली असली तरी राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला परवानगी मिळाली नसल्याने आणखी किती उत्पन्न बुडेल याचा अंदाज नाही.
( हेही वाचा : …तर २०२४ साली दिल्लीत चमत्कार होईल! )
दिवसाला ४ ते ५ हजार पर्यटक
कोरोना काळापूर्वी साधारणतः दिवसाला अंदाजे ४ ते ५ हजार पर्यटक प्राणीसंग्रहालयाला भेट देत होते. तर हाच आकडा सुटीच्या दिवशी १० हजारांपर्यंत जात असे. प्राणीसंग्रहालयांकडून प्रौढांसाठी ४० रुपये तर लहान मुलांसाठी १० रुपये तिकीटदर आकारण्यात येतो. या माध्यमांतून महिन्याला अंदाजे ५० लाख रुपयांपर्यंत प्राणी संग्रहालयाला उत्पन्न मिळत होते.
Join Our WhatsApp Community