राऊतांसह मलिकांनीही का सोडला पवारांच्या पंतप्रधानपदाचा नाद?

144

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ८१ व्या वाढ दिवशी खासदार अमोल कोल्हे यांनी ‘जर २७ खासदार असलेल्या गुजरातचा पंतप्रधान होवू शकतो तर ४२ खासदार असलेल्या महाराष्ट्राचा मावळा का त्या पदावर बसू शकत नाही’, असे सांगत शरद पवारांना पंतप्रधान पदासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर याचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला.

काँग्रेस म्हणजे ‘ धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जसा महाराष्ट्रात २०१९ मध्ये चमत्कार घडवून आणला तसा २०२४ मध्येही देशात चमत्कार घडवून आणू, असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यासाठी पवार यांनी नुकतेच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना त्यासाठी राजी केले आहे. मात्र ममता बॅनर्जी यांचा काँग्रेसप्रती असलेला राग उघड झाला आहे. अशीच परिस्थिती उत्तरप्रदेश, बिहार आणि अन्य राज्यांची असल्याचे लक्षात आल्यावर आणि काँग्रेस देशात सर्वात मोठा विरोधी पक्ष असून राहुल गांधी यांना डावलून चालणार नाही, हे समजल्यावर आता शिवसेनेचे नेते आणि पवारांचे पंतप्रधान पदाचे स्वप्न उराशी बाळगून असलेले संजय राऊत यांनी सोमवारी त्यांच्या भूमिकेपासून चक्क फारकत घेतली. त्यानंतर खुद्द राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही यापासून कोलांटउडी घेत, आम्ही कधीच पवार पंतप्रधान व्हावेत, असे बोललो नव्हतो, असे म्हटले आहे. यामुळे पवारांची आता भाजपच्या विरोधात भक्कम आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नात काँग्रेस मोठा अडथळा बनली आहे, हे समजल्यावर काँग्रेस म्हणजे ‘ धरले तर चावतय आणि सोडलं तर पळतय’ अशी अवस्था पवारांची झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

शरद पवार हे देशाचे पंतप्रधान व्हावेत, असे आपण कधीच बोललो नव्हतो, असे आपण कधी बोललो हे दाखवून द्यावे. मात्र पवार हे एकमेव नेते आहेत, जे भाजपच्या विरोधात विरोधकांचा भक्कम पर्याय निर्माण करू शकतात, त्यासाठी ते सर्व विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. यात काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, त्यामुळे काँग्रेसला डावलून चालणार नाही, त्यासाठी काँग्रेस नेतृत्वाशी आमची चर्चा सुरू आहे, हा प्रयत्न सध्या प्राथमिक स्तरावरचा आहे. आघाडीचे नेतृत्व कुणी करायचे, हे नंतर ठरवता येईल, असेही राऊत म्हणाले.

काय म्हणाले नवाब मलिक?

शरद पवार हे देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी आम्ही कधीच भूमिका मांडली नाही, मात्र देशात भाजपच्या विरोधात भक्कम पर्याय उभा करण्याचा पवारांचा प्रयत्न आहे. शेवटी कुणीही दीर्घकाळ सत्तेत राहू शकत नाही, हे भाजपने समजून घ्यावे, जे फडणवीस या विषयावर पवारांवर टीका करत आहेत, त्या भाजपचे १९८४ मध्ये केवळ २ खासदार निवडून आले होते, ते सायकलवरून डबल सीट संसदेत जायचे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

शरद पवार यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा आहेत. पवार हे पंतप्रधान पदाचे स्वप्न अनेक वर्षांपासून पाहत आहेत. मात्र अजूनही त्यांचा पक्ष १० खासदारांच्या पुढे गेला नाही. तरीही त्यांना पंतप्रधान पदासाठी शुभेच्छा आहेत.

२०१९ मध्येही केलेला प्रयत्न

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी असाच भाजपच्या विरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये आयोजित केलेल्या सभेत देशभरातील डझनभराहून अधिक विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते, त्यामध्ये मायावती, अखिलेश यादव यांच्यासह अरविंद केजरीवाल होते. मात्र याचे नेतृत्व राहुल गांधी यांनी करू नये, अशी भूमिका या सर्व पक्षांनी घेतली होती, त्यामुळे काँगेस स्वतंत्र लढली, परिणामी भाजपने सगळ्यांचा सुफडासाफ करून २०१४ पेक्षा अधिक जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते.

the accidental prime minister  होण्याचा मनसुबा?

याचा जबरदस्त धक्का पवारांना बसला असून आता २०२४ साठी सर्व प्रादेशिक पक्षांची पुन्हा एकदा मोट बांधताना काँग्रेसला कसे विश्वासात घ्यायचे आणि त्यासाठी राहुल गांधी यांना प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या रांगेत कसे बसवायचे, याकरता सोनिया गांधी यांच्यासह देशातील काँग्रेसच्या नेत्यांना कसे राजी करायचे, या विचाराने पवार अस्वस्थ झाले आहेत, हा प्रयोग यशस्वी झाला तर देवेगौडा, व्ही.पी. सिंग यांच्या प्रमाणे पवारांना the accidental prime minister होता येईल, असा मनसुबा पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आणि खासकरून संजय राऊत यांचा आहे, मात्र त्याकरता काँग्रेसचा अडथळा दूर करणे इतके सोपे नाही, हे समजल्यावर आता मलिक आणि राऊत यांनी तूर्तास पवारांच्या पंतप्रधान पदाच्या स्वप्नांची वाच्यता करणे थांबवल्याचे दिसत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.