औरंगाबाद दौऱ्यापूर्वी मनसेच्या होर्डिंगवर ‘जय श्रीराम’चा नारा!

138

दसऱ्याच्या दिवशी मनसेने शिवसेनेला खिजवण्यासाठी आणि हिंदुत्वाचा अजेंडा समोर आणण्यासाठी गर्व से कहो हम हिंदू है, अशा आशयाची बॅनरबाजी थेट शिवसेना भवनासमोर केली होती. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकनंतर औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये जय श्री रामचा नारा देणारं बॅनर लावून सेनेला आव्हान दिले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळाले आहे. आजपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

मनसे हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरणार!

आजचा नाशिक दौरा झाल्यानंतर राज ठाकरे उद्या औरंगाबादेत दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. या दौऱ्यापूर्वी औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करून वातावरण निर्मिती केली जात आहे. या बॅनरवर जय श्रीरामचा नारा दिल्याचे दिसतेय आहे. तसेच राज ठाकरे यांना श्री रामाची मूर्ती भेट देतानाचा फोटोदेखील लावण्यात आलेला आहे. शहरातील मुस्लिम बहुल भागात मनसेने ही बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरणार का, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसताय.

(हेही वाचा-राऊतांसह मलिकांनीही का सोडला पवारांच्या पंतप्रधानपदाचा नाद?)

मराठवाड्यातील मोर्चेबांधणीचं राज ठाकरेंसमोर आव्हान

आज राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी अनेक कार्यकर्ते मनसेमध्ये प्रवेश करतील. हा पक्ष प्रवेश सोहळा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत जंगी सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या औरंगाबादमध्ये सकाळी 10 वाजता मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. त्यानंतर राज ठाकरे दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मराठवाडा दौऱ्याची घोषणा केली होती. मात्र काही कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर असतील अशी घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या दौऱ्याआधीच पदाधिकारी फुटले असल्याची चर्चा मराठवाड्यात होताना दिसतेय. त्यामुळे आता मराठवाड्यातील मोर्चेबांधणी हे राज ठाकरे यांच्यासमोरील मोठे आव्हान असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.