शशिकांत काळे सेवेतून बडतर्फ : स्थायी समिती घेणार ‘हा’ निर्णय

132

मुंबई अग्निशमन दलातील निलंबित प्रभारी प्रमुख अग्निशमन अधिकारी असलेल्या शशिकांत काळे यांना अखेर बडतर्फ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. काळे यांच्या विरोधात नेमलेल्या चौकशी समितीने त्यांच्यावरील सर्व दोषारोप सिध्द झाल्याने त्यांना बडतर्फ करण्याची शिफारस केली होती. त्या शिफारशीनुसार बडतर्फ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालकांना शिफारशी

मुंबई महानरपालिकेतील मुंबई अग्निशमन दलातील शशिकांत अनंत काळे हे १० ऑगस्ट २०२० पासून कार्य व्यवस्थेअंतर्गत प्रमुख अग्निशमन अधिकारी (प्रभारी) या पदावर कार्यरत असताना, ३ नोव्हेंबर २०२० मध्ये मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अग्निशमन सेवा पदकासाठी महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरीने महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालकांना शिफारशी सादर केल्या होत्या. अन्य कर्मचारी व अधिकारी यांजसह राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक याकरीता प्रमुख अग्निशमन अधिकारी म्हणून शशिकांत काळे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यात चुकीची, विपर्यस्त, असत्य व दिशाभूल करणारी असल्याचे आढळून आल्याने काळे खात्यांतर्गत सर्वंकष चौकशी करून दोषारोप ठेवण्यात आले होते.

(हेही वाचा सफाई कामगारांना मिळणार १४ हजार रुपये! कसे ते वाचा…)

चुकीची व विपर्यस्त माहिती सादर केली

काळे यांना प्रमुख अग्निशमन अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. पण त्यांनी राष्ट्रीय पदकांसाठीच्या पुरस्काराकरीता प्रशासनाच्या वतीने शिफारस करताना त्यांचे पदनाम प्रमुख अग्निशमन अधिकारी (प्रभारी) म्हणून नमूद करणे आवश्यक होते. पण त्यांनी त्याऐवजी प्रमुख अग्निशमन अधिकारी असे पदनाम नमूद केले होते. काळे यांनी स्वत:चे पदनाम सर्वत्र प्रमुख अग्निशमन अधिकारी असे नमूद करुन पदकासाठी शिफारस केली आहे. काळे यांच्या सन २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षीच्या गोपनीय अहवालातील त्यांनी चुकीचे व विपर्यस्त सादर केले. सन २०१४-१५ मध्ये काळे हे महानगरपालिकेच्या सेवेतून २१ नोव्हेंबर २०१४ ते ११ ऑक्टोबर २०१५ पर्यंत निलंबित होते. त्यामुळे त्यांचा गोपनीय अहवाल भरण्यात आला नसतानाही, त्यातील प्रतवारी ‘अ-उत्कृष्ट’ अशी देऊन त्यांनी चुकीचे व विपर्यस्त सादर केले, असे चौकशी समितीने म्हटले आहे. अचुक माहिती नमूद करणे अपेक्षित असताना, तेथे अशी चुकीची व विपर्यस्त माहिती सादर केली.

म्हणून काळे यांच्यावर ‘बडतर्फ’ करण्याची शिफारस 

राष्ट्रपती पदकासाठी शिफारस करते वेळी दहा वर्षांच्या कालावधीमध्ये कोणतीही किरकोळ वा जबर शिक्षा झालेली नसावी, असे संबोधित असतानाही ही माहिती जाणुनबुजुन लपवली लपवत त्याद्वारे शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असेही म्हटले आहे. चुकीची व विपर्यस्त माहिती दिल्याने प्रशासनाकडून शासनास सादर झालेला प्रस्ताव मागे घेण्याची व सुधारित प्रस्ताव सादर करण्याची नामुष्की ओढवली. परिणामी, मुंबई महानगरपालिका प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली असल्याचे म्हटले आहे. अभिलेख निर्माण करणाऱ्या प्राधिकारणाचा प्रभारी प्रमुख म्हणून शशिकांत काळे यांनी त्यांची कर्तव्ये प्रामाणिकपणे व सचोटीने पार पाडली नाही. त्यामुळे वरिष्ठांची हेतुपुरस्सर आणि जाणीवपूर्वक, दिशाभूल, वरिष्ठांचा विश्वासघात तसेच याअनुषंगाने राज्य शासन, राज्यपाल, राष्ट्रपती यांचीही दिशाभूल करणारे आहे. तसेच खातेप्रमुख म्हणून त्यांचे हे कृत्य अतिशय हीन स्वरुपाचे आणि अत्यंत अशोभनीय असल्याने त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचा-यांसाठी चुकीचा पायांडा पाडणारे आहे. ही कृत्ये गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तणुकीची असल्याने त्या काळी यांची खात्यांतर्गत सर्वंकष चौकशीची प्रक्रिया चौकशी अधिकारी म्हणून उप-आयुक्त (परि. सात) यांनी पूर्ण केली. त्यात काळे यांच्यावरील ठेवण्यात आलेले दोषारोप पूर्णत: सिध्द झाल्यामुळे या आरोपाबाबत शिक्षा म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून ‘बडतर्फ’ करण्याची शिफारस केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.