…अन् फडणवीसांना बिलगून बावनकुळेंना आनंदाश्रू झाले अनावर

मी निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद बावनकुळेंच्या विजयाने झाला अशी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया दिली.

113

विधान परिषद निवडणुकांच्या दोन जांगांचे निकाल समोर आले आहे. नागपूरसह अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघातील या दोन्ही जागांवर भाजपचा दणदणीत विजय झाला. नागपूरच्या जागेवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला असून त्यांना 362 मतं मिळाली. चंद्रशेखर बावनकुळे हे विजयी झाल्याचे घोषित करण्यात आल्यानंतर भाजपने त्यांची विजयी मिरवणूक काढली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गळ्यात हार घालून अभिनंदन केले. फडणवीसांनी त्यांच्या गळ्यात विजयाची माळ घातल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे भावूक झाले. यावेळी त्यांनी फडणवीसांना मिठी मारली आणि बिलगल्यानंतर बावनकुळेंना आनंदाश्रू अनावर झाले.

(हेही वाचा -महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ‘या’ दोन्ही जागांवर ‘कमळ’ फुललं!)

‘त्यापेक्षा जास्त आनंद बावनकुळेंच्या विजयाने झाला’

यावेळी बावनकुळेंना अश्रू अनावर झाल्याचे बघता फडणवीसांनाही गहीवरून आले. ते म्हणाले, “मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद मला आज बावनकुळेंच्या विजयाने झाला. बावनकुळेंच्या विजय महाविकास आघाडीला चपराक आहे.” पुढे ते असे ही म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता भाजपच्या पाठिशी आहे, भविष्यातही आम्हाला आशिर्वाद मिळेल. चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय हा भविष्यातील विजयाची नांदी आहे. आमचे राष्ट्रीय नेते मोदी, अमित शाह, नड्डा यांचे मनापासून आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विजयाच्या मालिकेची सुरूवात झाली

विधान परिषद निवडणुकांमध्ये विजय मिळाल्यानंतर फडणवीस म्हणाले, विशेष आभार मानतो नितीन गडकरी यांचे, त्यांच्या नेतृत्त्वात आम्ही लढलो आणि आम्हाला विजय मिळाला. विजयाच्या मालिकेची सुरुवात यानिमित्ताने झाली आहे. महाविकास आघाडीची मतं ही नागपूर आणि अकोल्यात मिळाली. ज्यांनी मतं दिली त्या सर्वांचे आभार मानतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.