मुन्नाभाई एम बी बी एस पद्धतीने कॉपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मुन्नाभाईला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एसआरपीएफच्या रविवारी झालेल्या लेखी परिक्षेत एका तरुणाने आपल्या भावाच्या जागेवर पेपर देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर, त्याने ब्ल्यूटुथद्वारे कॉपी करण्याचाही प्रयत्न केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
एसआरपीएफ भरती परीक्षा
विशाल गबरुसिंग बहुरे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भरतसिंग गबरुसिंग बहुरे या जोडवाडी औरंगाबाद येथे राहणाऱ्या त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसआरपीएफ भरतीची रविवारी लेखी परीक्षा होती. हडपसर येथील एस एम जोशी कॉलेजमध्ये या परीक्षेचे केंद्र होते. यावेळी विशाल हा त्याचा भाऊ भरतसिंग याच्या नावाने लेखी परीक्षा देण्यास आला होता. परिक्षा देत असताना आरोपी कॉपी करण्यासाठी ब्ल्यूटुथचा वापर करीत असल्याचे आढळून आले.
( हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल! ‘त्या’ आमदारांचे वाजले ‘बारा’ )
लष्कर कोर्टात हजर करणार
आरोपी विशालला जागेवरच पकडण्यात आले असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत आरोपीला आज लष्कर कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. अशी माहिती, हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली आहे.