सोलापूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला जप्तीची अंतिम नोटीस आली, तरीही कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके नॉटरिचेबल आहेत अर्थात त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. मागील तीन महिन्यांपासून कारखाना सुरू करण्यासाठी आर्थिक जुळणी करण्याच्या निमित्ताने भूमिगत असलेले भालके सामान्य कार्यकर्त्यांच्या संपर्काबाहेर गेले आहेत.
तीव्र नाराजी
एवढेच नव्हे, तर भगीरथ भालके हे कारखान्याचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ संचालक यांच्याही संपर्कात नाहीत. त्यामुळे समर्थक संचालकांचाही संयम सुटत चालल्याचे दिसून येते. संस्था बुडत आहे, अगदी नाका तोंडात पाणी चालले, तरीही त्यांचे मौन सुटत नाही, हे पाहून विठ्ठल साखर कारखाना परिवारासह शेतकरी सभासद व समर्थकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होत आहे.
( हेही वाचा : राज ठाकरे म्हणतायत, ‘लोक मला फुकट घालवत आहेत!’ )
कारखान्यावर कर्जाचा डोंगर
श्री विठ्ठल साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेचे सुमारे ४०० कोटी रुपये कर्ज आहे. मागील हंगामातील सुमारे ३० कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे आहेत. तोडणी, वाहतूकदार आणि कामगारांची देणी आणखी वेगळी आहेत. या आर्थिक भारामुळे यंदा कारखाना सुरू होऊ शकला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून अध्यक्ष भालके हे कारखाना सुरू करण्यासाठी, पैसे उभा करण्यासाठी म्हणून पुणे, मुंबई, दिल्ली वाऱ्या करीत आहेत, असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. मात्र, हंगाम संपला तरीही कारखाना सुरू होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. मागील थकीत देणीविषयी शेतकऱ्यांना सामोरे जाताना सर्व संचालक मेटाकुटीला आले आहेत. भालके यांच्याकडून नेमके काय प्रयत्न सुरू आहेत, हे त्यांनाही कळायला मार्ग नसल्याचे कारखान्यातील संचालकांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community