हिंदू व्होट बँक, हिंदुत्व आणि राहुल गांधी  

155

काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्यांच्या एका वक्तव्याने भारीच चर्चेत आले आहेत. त्यांनी सार्वजनिकरित्या सांगितले की, मी हिंदू आहे आणि देशात हिंदुत्ववाद्यांचे नव्हे, तर हिंदूंचे राज्य आणायचे आहे. काँग्रेसच्या आजवरच्या इतिहासात त्यांच्या प्रमुख नेत्याला मी हिंदू आहे, असे बोलायची वेळ आली नव्हती, राहुल गांधी यांच्यावर ती आली, याचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले पाहिजे. पण नुसते हिंदू म्हणून घेऊन राहुल गांधी यांच्या हाती काही लागणार नाही, कारण मागील ७ दशके हिंदू स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचाच, २०१४ साली त्याला ‘तो हिंदू आहेे’ याची ‘जाणीव’ झाली आणि तो हिंदुत्ववादी बनला, त्यामुळे राहुल गांधी यांना सांप्रत काळातील भारतीय राजकारणाची दिशा समजण्यात अजून गल्लत झाली आहे.

काँग्रेसची आजवरची काय होती राजकीय दिशा?

मागील ७ दशके काँग्रेसने भारतीय राजकारणाची एक विशिष्ट पायवाट तयार केली होती. त्यासाठी ‘फोडा आणि राज्य करा’, ही इंग्रजांची नीती अवलंबली होती. हा देश एकसंध राहता कामा नये, अन्यथा संपूर्ण समाजाचे एकाच वेळी मतपरिवर्तन होण्याचा संभव बनेल आणि तसे झाल्यास सत्तांतर सहज शक्य आहे. मग करायचे काय, तर भारतीय समाजाला धर्म, जातीमध्ये विभागायचे! मुसलमान, खिस्ती, दलित यांच्यात त्यांच्या त्यांच्या पंथाचा आत्मसन्मान वाढू द्यायचा, त्यासाठी त्यांना वेगळ्या सवलती, सुविधा, आरक्षणे देऊन ‘आपण वेगळे आहोत, अल्पसंख्यक आहोत म्हणून आपल्याला राजाश्रय आहे, म्हणून आपण सुरक्षित आहोत, त्यासाठी  हे वेगळेपण टिकवून ठेवणे ही आपल्यासाठी गरज आहे’, असा विचार त्यांच्या मनावर बिंबवायचा. काँग्रेसच्या या रणनीतीमुळे या समुदायात राष्ट्र प्रथम ऐवजी धर्म, पंथ आधी, असा समज दृढ झाला. काँग्रेसच्या राजाश्रयामुळे ‘काँग्रेसशिवाय तरणोपाय नाही’, या विचारामुळे तो ७ दशके ‘ ताई, माई, अक्का, विचार करा पक्का आणि पंजावरच मारा शिक्का’, अशी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या निवडणुकीत आरोळी ऐकू येताच मेंढरांच्या कळपाप्रमाणे रांगेत जाऊन पंजावर शिक्का मारू लागला. दुसरीकडे बहुसंख्य हिंदू धर्मीयही हिंदू म्हणून एकसंध राहणार नाही याचीदेखील खबरदारी घेतली, त्यांच्यामध्ये हिंदू म्हणून जाणीव जिवंत ठेवली नाही. त्यांना अठरा पगड जातीत विभागून ठेवले. जातीजातींचे नेते निर्माण केले आणि त्यांचे त्यांचे वेगवेगळे गट मतपेटीच्या रूपाने निर्माण केले. अशा रीतीने संपूर्ण भारतीय समाज पद्धतशीरपणे विभागून प्रत्येकाला कायम आश्रित ठेवण्याचा प्रयत्न करून सत्तेत राहण्याची पायवाट तयार केली.

(हेही वाचा ‘आमचं हिंदुत्त्व पळपुटं नाही’, पाटलांच्या वक्तव्यावर राऊतांचा हल्लाबोल)

२०१४ साली प्रथमच काँग्रेसची पायवाट बुजली

२०१४ साली पहिल्या प्रथम देशात हिंदू व्होट बँक असते, हे भारतीय राजकारणात रुजवले गेले. हिंदू म्हणून सकल हिंदू समाजाला जगण्याचा हक्क मिळेल, असा विश्वास मिळाला. परिणामी कधी नव्हे ते बहुसंख्य हिंदू समाजाने नरेंद्र मोदी यांना मते दिली आणि हिंदू व्होट बँकने काँग्रेसचे होत्याचे नव्हते झाले. २०१९ मध्ये काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी पुन्हा काँग्रेसच्याच पारंपरिक विभाजनाच्या नीतीवर मते मागितली, मात्र त्यावेळी हिंदूंनी अधिक त्वेषाने नरेंद्र मोदींना मते देऊन २०१४ च्या तुलनेत आणखी स्पष्ट बहुमत दिले.

स्वतःला नुसते हिंदू म्हणवून घेणे हा राजकारणात सरून गेलेला टप्पा

एव्हाना भारतीय राजकारणात काँग्रेसची ७ दशकांची विभाजनाची पायवाट आता पुसली गेली आहे. हे काँग्रेससह तिच्या समविचारी प्रादेशिक पक्षांना कळून चुकले आहे. त्यामुळे आता कधी नव्हे ते ७ दशकानंतर काँग्रेसचा प्रमुख नेता ओरडून स्वतःला मी हिंदू असल्याचे सांगत आहे. हे नरेंद्र मोदी यांचेच यश आहे. पण राहुल गांधी हे जाणून नाही, ते स्वतःला जसे हिंदू म्हणवून घेत आहेत, तसे हिंदू ७ दशके म्हणवून घेत आला होता, आता हिंदूंना ‘तो हिंदू असल्याची ‘जाणीव’ झाली आहे’, हे हिंदुत्व आहे. त्या अर्थाने सकल हिंदू समाज हिंदुत्ववादीच बनला आहे. ज्याने मोदींना २ वेळा निर्विवाद सत्ता दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी स्वतःला हिंदू म्हणवून घेवू लागले, हा सध्याच्या भारतीय राजकारणात मागे सरून गेलेला प्राथमिक टप्पा झाला, राहुल गांधी आजही ज्या हिंदुत्वाला नाकारत आहे किंबहुना तुच्छ लेखत आहे, ते हिंदुत्व भारतीय राजकारणाचा सांप्रतकाळातील टप्पा आहे. त्यामुळे नुसते हिंदू म्हणवून राहुल गांधी यांच्या हाताशी काही लागणार नाही. तसा त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देवळांमध्ये जाऊन, पूजा अर्चा करून कपाळावर भला मोठा लालभडक टिळा लाऊन प्रयत्न केला होता, मात्र परिणाम काय झाला हे वेगळे सांगायला नको!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.