छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल 2022, हे ‘वेद’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे. कलात्मकता आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेले छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल -2022 हा जानेवारीत १४ ते १६ दरम्यान होणार आहे. या कला महोत्सवाची अधिकृत घोषणा मंगळवारी राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. या आर्ट फेस्टिवलमध्ये नामांकित कला संस्थांच्या विद्यार्थ्यांच्या सहयोगाने विविध सामाजिक संकल्पनांवर आधारित ‘कलाशिल्प सादरीकरण’ केले जाणार आहे.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
पार्क परिसराच्या भोवताली कलाकारांच्या कलात्मकतेतून ‘कलाकृतींची सजावट’ नाविन्यपूर्ण कलात्मक उत्पादने निर्मित करणाऱ्या संस्थांच्या निवडक स्टॉल्सच्या माध्यमातून ‘कलाकृतींची शॉपिंग प्रदर्शन’ आणि खाद्य रसिकांसाठी ‘खाद्य महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. सागर किनारी स्वर सागर व्यासपीठाच्या माध्यमातून ‘संगीत मैफिल’ सुद्धा आयोजित केली जाणार आहे.
अनोखी कलापर्वणी
विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित, नावाजलेल्या व्यक्तींच्या यशोगाथा तसेच महत्वाच्या विषयांवर त्यांचे विचार ऐकण्यासाठी ‘संवाद कट्टा’, कलेसोबत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या शौर्याच्या यशोगाथा आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी ‘गडकिल्ले छायाचित्र प्रदर्शन’ तसेच ‘ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन’ आदींचे आयोजन केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल २०२२ मुंबईकरांसाठी अनोखी कलापर्वणी ठरणार आहे.