काय सांगताय! ‘या’ प्राण्याच्या केसांपासून बनवलेले रंगकामाचे ब्रश जप्त!

153

मुंगूस या वन्यप्राण्याच्या केसापासून बनवलेल्या पेंटींग ब्रशच्या विक्रीला वनविभागाने बुधवारी साता-यातील कराड परिसरात लगाम लावला. तब्बल १ हजार ७३५ रंगकामाचे ब्रश वनविभागाच्या धडक कारवाईत जप्त करण्यात आले. यावेळी पाच विक्रेत्यांनाही वनविभागाने ताब्यात घेतले असून, याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये, कलम ३९, ४९ ब, ५० आणि ५१ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साता-यात मोठ्या प्रमाणात मुंगूसाच्या केसांपासून बनवलेले रंगकामाचे ब्रश दुकानात विक्रीसाठी ठेवल्याची माहिती वनाधिका-यांना मिळाली. केंद्रीय पर्यावरण वने व वातावरणीय बदल विभागांतर्गत मोडल्या जाणा-या वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्ष व राज्याच्या वनविभागाच्या कराड विभागीय वनाधिका-यांकडून कराड व मलकापूर येथील पाच दुकानांवर धाडी टाकल्या.

(हेही वाचा – मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील 38 इमारती बेकायदेशीर!)

मुंगूसाविषयी… 

वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार मुंगूस या वन्यप्राण्याला शेड्युल्ड २ अंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे मुंगूसाची शिकार, तस्करी किंवा त्याच्या शरीरातील भागांची विक्री ही कायद्याने गुन्हा ठरते.

आरोपींची नावे व तपशील 

  • कराड येथील मणकापूर येथील राजेंद्र सुपणेकर (३७) यांच्या शिवानी पेंट्स दुकानावर छापा टाकण्यात आला. त्यांच्याकडून ९२ ब्रश जप्त करण्यात आले
  • कराड येथील शनिवार पेठेतील देवकर पेंट्च्या संदीप देवकर (४५) यांच्याकडून ४४७ ब्रश जप्त करण्यात आले
  • वघेरी येथे राहणा-या तोहिम शेख (३९ ) यांच्या मलकापूर येथील सनशाईन पेंट्स मधून २१२ ब्रश जप्त करण्यात आले
  • मलकापूर येथील नविद वाईकर (२४) यांच्या भारत पेंट्स या दुकानातून १६३ ब्रश जप्त करण्यात आले
  • कराड येथील सह्याद्री पेंट्सच्या अखतर वाईकर (५१) यांच्याकडून ८२१ ब्रश जप्त करण्यात आले.

कराड येथून मुंगूसाच्य केसापासून बनवलेल्या रंगकामाचे ब्रश हस्तगत करण्यात आले असून, याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु आहे, असे कोल्हापूर वनविभाग (प्रादेशिक) वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. बॅन क्लेमेंट यांनी सांगितले.

कारवाईतील वनाधिकारी 

कोल्हापूर (प्रादेशिक) वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, परिक्षेत्र वनाधिकारी तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे तसेच सदर कारवाई मध्ये वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो मुबंई येथून आलेले कॉन्स्टेबल विजय नांदेश्वर व संदीप येवले तर वनविभाग कराड येथील वनपाल ए. पी. सावखंडे, डी. डी. जाधव, बि. बी.कदम, तर वनरक्षक रमेश जाधवर, दत्ता जाधव, अरुण सोळंखी, उत्तम पांढरे, अश्विन पाटील, शंकर राठोड, सुभाष गुरव, सविता कुट्टे,दीपाली अवघडे, पूजा परुले, पूजा खंडागळे, शीतल पाटील, संतोष यादव,अरविंद जाधव हे सहभागी होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.