वेटर ते गॅंगस्टर…असा होता सुरेश पुजारीचा प्रवास

115

गुन्हेगारी जगतात येण्यापूर्वी प्रत्येक गॅंगस्टरचा इतिहास काही वेगळाच असतो, असाच इतिहास नुकताच फिलिपाइन्समधून अटक करून मुंबईत आणण्यात आलेला गॅंगस्टर सुरेश पुजारी याच देखील आहे. अंबरनाथमध्ये एका ढाब्यावर वेटरची नोकरी करणारा सुरेश पुजारीने कुख्यात खंडणीखोर म्हणून गुन्हेगारी जगतात प्रवेश केला. ९०च्या दशकात सुरु झालेला सुरेश पुजारी याचा प्रवास डिसेंबर २०२१ मध्ये थांबला. दोन महिन्यापूर्वीच सुरेश पुजारी याला फिलिपाइन्स येथे अटक करण्यात आली होती, त्यानंतर त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले. १५ डिसेंबर रोजी गँगस्टर सुरेश पुजारीला अटक करून ठाण्यात आणण्यात आले. ज्या ठाणे जिल्ह्यातून गुन्हेगारीचा प्रवास सुरु झाला, त्याचा ठाणे जिल्ह्यात सुरेश पुजारीचा गुन्हेगारीचा प्रवास येऊन थांबला.

अंबरनाथमध्ये भाड्याच्या खोलीत रहायचा 

सुरेश बसप्पा पुजारी (४६) हा कर्नाटक राज्यातून ९०च्या दशकात मुंबईत नोकरीच्या शोधात आला होता. ओळखीने तो उल्हासनगर येथील एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये वेटरची नोकरी करू लागला. अंबरनाथ येथे तो एका भाड्याच्या खोलीत काही सहकारी वेटर सोबत राहत होता. उल्हासनगर येथील बार मधील नोकरी सोडल्यानंतर तो उल्हासनगरमधील एका हायवे ढाब्यावर वेटरची नोकरी करीत होता.

(हेही वाचा आता ठाणेकरांच्याही ख्रिसमस पार्ट्यांवर विरजण!)

खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

१९९३ मध्ये सुरेश पुजारीवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. ढाब्यावरील एका वेटरला ग्राहकाकडून होणाऱ्या मारहाणीत पुजारीने हस्तक्षेप करून त्या वेटरला वाचवून ग्राहकाला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. हॉटेलमधील वेटरचा जीव वाचवल्याची चर्चा संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पसरली आणि सुरेश पुजारी वेटर यांचा मसीहा बनला. जामिनावरून बाहेर आल्यानंतर सुरेश पुजारीने हॉटेल बार व्यावसायिकांना आपले लक्ष केले आणि त्यांच्याकडून खंडण्या उकळू लागला, यामध्ये त्याला साथ लाभली ती ठाणे जिल्ह्यातील बारमध्ये काम करणाऱ्या वेटर्स यांची. हे वेटर्स सुरेश पुजारीचे खबरी बनले होते. बार मालकांची इत्यंभूत माहिती सुरेश पुजारीपर्यंत पोहचवू लागेल आणि या वेटर्सच्या जीवावर पुजारी हा आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला. त्यानंतर २००२ मध्ये एका दरोडा आणि अपहरण याप्रकरणी मुंबईच्या डीएननगर पोलिसांनी त्याला अटक केली.

राजकीय पक्षाच्या नेत्यांना धमकी

युती सरकारच्या काळात सुरेश पुजारीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना खंडणीसाठी फोन करून धमकी दिली होती. आव्हाड यांनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यांना पत्र लिहून धमकीची माहिती दिली होती. तत्पूर्वी सुरेश पुजारीने आमदार आणि केबल व्यवसायिक असलेले आमदार गणपत गायकवाड यांना धमकी देऊन खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी गायकवाड यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. माजी आमदार पप्पू कलानी याचा मुलगा ओमी कलानी याला देखील धमकी देऊन खंडणी मागितली होती. सुरेश पुजारी याने राजकीय नेत्यांना धमकीचे सत्र सुरू केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

गुप्तचर यंत्रणेच्या रडार सुरेश पुजारी…

सुरेश पुजारी २०१३ मध्ये भारतात पोलिसांच्या रडारवर आला होता. सुरेश पुजारीच्या मुलाचा कर्करोगाने २०१३ मध्ये मृत्यु झाला होता, मुलाच्या अंत्यविधीसाठी सुरेश पुजारी हा भारतात आला होता. सतीश शेखर पै नावाने त्याने पासपोर्ट बनवून तो भारतात आला, त्यावेळी सतीश पै हाच सुरेश पुजारी असल्याचे गुप्तचर यंत्रणेला सुगावा लागला होता, मात्र तोपर्यंत पुजारी हा भारतातून पळून जाण्यास यशस्वी ठरला होता, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सतीश पै हे नाव धारण करून भारतात आलेला सुरेश पुजारी भारतात कुणाला भेटला याचा मग काढल्यानंतर त्याच्या कुटुंबाची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून मुंबई पोलिसाची गुप्तचर यंत्रणा त्याच्या परदेशातील हालचालींचा मागोवा ठेवत होते, त्यात त्याने त्याच्या कुटुंबासह केलेल्या आर्थिक व्यवहारांचा समावेश होता. एका प्रसंगात, उदाहरणार्थ, कुटुंबाला त्याच्याकडून स्कूटर खरेदी करण्यासाठी पैसे मिळाले होते, तथापि, त्याच्या हालचालींचा आणखी एक दिलासा म्हणजे सुरेशसोबत राहणाऱ्या फिलिपिनो महिलेची सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटी वाढली होती, त्यात सुरेशचे फोटो मिळाल्यानंतर सुरेश पुजारी फिलिपाईन्समध्ये लपून बसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.