मुंबई महापालिकेच्या मागील सभेमध्ये सत्ताधारी शिवसेना आणि पहारेकरी असलेल्या भाजपमध्ये शाब्दिक राडेबाजी झाल्यानंतर पोलिसांपर्यंत पोहोचलेल्या या प्रकरणाची दखल घेत, राणीबाग येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या परिसरात पोलिसांची फौज निर्माण करण्यात आली होती. त्यामुळे येथील पाटणवाला रोडला छावणीचे स्वरुप आले होते. परंतु बाहेर पोलिसांचा पहारा वाढवण्यात आला असला, तरी गुरुवारी झालेल्या सभेमध्ये अत्यंत शांततेतच कामकाज पार पडले.
सभेच्या दिवशी पोलिस सज्ज
मागील महापालिका सभेमध्ये नायर रुग्णालयात रुग्णावर उपचार करण्यात डॉक्टरांकडून झालेल्या दिरंगाईचे तीव्र पडसाद उमटले होते. याचा निषेध म्हणून भाजपच्या आरोग्य समिती सदस्यांनी आपल्या राजीनामा पत्रात उल्लेख केलेल्या भाषेचा समाचार घेताना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अर्वाच्च भाषा वापरली. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये झालेली हमरीतुमरी आणि सभागृहाच्या बाहेर झालेली धक्काबुक्की आणि घोषणाबाजी आदी पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांनी सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन तक्रार केली. या तक्रारीनंतर नांगरे पाटील यांनी महापालिका सभेच्या दिवशी येथील पोलिस सज्ज ठेवत या रस्त्यांवर नगरसेवकांसह अन्य कुठल्याही पक्षांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला होता.
( हेही वाचा : निवडणुकीपूर्वी मुंबईत रस्ते विकासाचा २२०० कोटींचा बंपर! )
त्यानुसार गुरुवारी झालेल्या महापालिका सभेच्या दिवशी महापौर निवासापासून ते सफाई चौकीपर्यंतच्या परिसरात पोलिसांची फौज उभी करण्यात आली होती. महापालिका सभेसाठी एवढी मोठी पोलिस यंत्रणा उभी केल्याने नगरसेवकांमध्ये कुजबुज सुरु होती. मात्र, बाहेर पोलिस फौज असली तरी मागील सभेप्रमाणे शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांमध्ये कुठेही घोषणाबाजीही झाली नाही. दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी चिडीचूप होत कामकाजात भाग घेतला. विशेष म्हणजे या सभेमध्ये महापौर किशोरी पेडणेकर या स्वत: उपस्थित नव्हत्या. वाराणसी येथे ऑल इंडिया मेयर कौन्सिल आयोजित करण्यात आली असून यामध्ये सहभागी होण्यासाठी महापौर वाराणसीला गेल्या आहेत. त्यामुळे महापालिका सभेत उपमहापौर ऍड सुहास वाडकर यांनी पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
शिक्षणाधिकारी परत गेले, तरीही सत्ताधाऱ्यांच्या अविश्वास
मुंबई महापालिका शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या महेश पालकर यांच्या विरोधात सत्ताधारी शिवसेनेनेच अविश्वास ठराव मांडण्यासाठी सभागृहाला पत्र दिले होते. परंतु जुलै महिन्यात पालकर यांना पुन्हा शासनाकडे पाठवण्यात आल्यानंतर त्याठिकाणी प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून राजू तडवी यांनी कामकाज पाहिले. त्यानंतर आता त्याठिकाणी शासनाकडून शिक्षणाधिकारी म्हणून राजेश कंकाळ यांना ९ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईत शिक्षणाधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले. परंतु पालकर सेवेत असताना त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणता आला नाही. त्यामुळे अखेर त्यांना पुन्हा शासनात पाठवल्यानंतर सहा महिन्यांनंतर सत्ताधारी पक्षाने हा प्रस्ताव निकालात काढला. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला केवळ धमकीच देता येते, त्यांना करून दाखवता येत नाही,असेच गुरुवारच्या सभेमध्ये दिसून आले.
Join Our WhatsApp Community