श्वान पथके घेणार कारागृहातील ‘ड्रग्स’चा शोध

118

मुंबईसह राज्यात फोफावलेला ड्रग्सचा काळाबाजार राज्यातील कारागृहाच्या आतापर्यंत जाऊन पोहचला आहे. कैद्याकडून लपवून ठेवण्यात येणारा ड्रग्सचा शोध घेण्यासाठी आता श्वान पथकाची मदत घेतली जाणार असल्याचा निर्णय अप्पर पोलिस महासंचालक (कारागृहे) अतुलचंद्र कुलकर्णी यांनी घेतला आहे. या प्रकारचे परिपत्रक कारागृह प्रशासनाने राज्यभरातील लहान मोठ्या कारागृहाला पाठवले असून श्वान पथकाची तपासणी कुठल्या कारागृहात कुठल्या वेळी होणार हे मात्र गुपित ठेवण्यात आले आहे.

चिरीमिरी देऊन अमली पदार्थ कारागृहात आणला

राज्यात ४७ मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहे आहेत. या कारागृहमध्ये कैद्याकडून लपून छपून अमली पदार्थ कारागृहात आणले जातात, तर काही कारागृहामध्ये अधिकारी आणि तेथील सुरक्षा यंत्रणेला चिरीमिरी देऊन अमली पदार्थ कारागृहात आणला जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे अमली पदार्थ कैद्याकडून बॅरेकमध्ये अशा ठिकाणी लपवण्यात येते, त्या ठिकाणी तुरुंगातील अधिकारी देखील पोहचू शकत नाही. कारागृहात प्रत्येक वेळी वरिष्ठ अधिकारी यांच्या ‘सरप्राईज विझिट’ घेतल्या जातात, मात्र कारागृहातील कैद्यांना तत्पूर्वीच त्याची खबर लागत असल्यामुळे हा अमली पदार्थ लपून ठेवला जातो.

(हेही वाचा आधार कार्ड नवजात बालकाचेही काढा, पण…)

प्रत्येक कारागृहात श्वान पथके अचानक येऊन धडकतील

कारागृहातील अमली पदार्थचा साठा समूळ नष्ट करण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून श्वान पथकाची मदत घेतली जाणार आहे. हे श्वान खास करून अमली पदार्थ शोधणारे असतील. राज्यातील प्रत्येक कारागृहात श्वान पथके अचानक येऊन धडकतील आणि कारागृहातील कैद्यांना ठेवण्यात येणारे बॅरेक व तसेच जागा तपासल्या जातील. ज्या कैद्याकडे अमली पदार्थ मिळून येतील, तसेच त्यांना अमली पदार्थ घेऊन येण्यास मदत करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारागृहाला व्यसनमुक्ती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या कारवाईमुळे राज्यातील कारागृह ड्रग्समुक्त होतील, असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. याबाबत राज्यातील ४७ लहान मोठ्या कारागृहांना याबाबत परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले असले, तरी श्वान पथकाची सरप्राईज विझिट असणार असून याची पूर्वसूचना देण्यात येणार नसल्याचे अधिकारी यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.