गोरेगाव-मुलुंड जोड रस्ते प्रकल्पाच्या पहिल्या दोन टप्प्यातील कामांना सुरुवात झाल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील ६६६ कोटी रुपयांच्या कामांसाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पातंर्गत गोरेगाव रत्नागिरी हॉटेल चौक येथे सहा पदरी उड्डाणपूल, मुलुंड खिंडीपाडा येथे उन्नत मार्ग आणि मुलुंड डॉ. हेगडेवार चौक येथे सहा पदरी उड्डाणपुलाचे बांधकाम यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या रस्ते प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे.
महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प
कोस्टल रोडप्रमाणे गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प हा महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा हा चौथा जोड रस्ता असून १२.२ कि.मी लांबीच्या या रस्ते प्रकल्पात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून ४.७ कि.मी लांबीचा भूमिगत बोगदा आहे. पहिल्या टप्प्यातील नाहूर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील काम हे प्रस्तावित बोगद्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या जोड रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम ऑक्टोबर २०१८ मध्ये हाती घेण्यात आले आहे. हे काम मार्च २०२२ रोजी पूर्ण होणे अपेक्षित आहे.
तर तिसऱ्या टप्प्यातील गोरेगाव येथे रत्नागिरी चौक येथे दिंडोशी कोर्ट ते फिल्म सिटीपर्यंत सहा पदरी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. १.२६ कि.मी लांबीचे हे सहापदरी पुल असून रुंदी २४.२० मीटर एवढे आहे. आणि दिंडोशी कोर्ट जवळ पादचाऱ्यांसाठी लिंक रोड ओलांडण्यासाठी पादचारी पूल आणि त्याकरता स्वयंचलित जिन्याची व्यवस्था असेल.
( हेही वाचा : वाहन क्रमांकाची नवी मालिका सुरू होतेय! कोणती ती जाणून घ्या… )
चक्रीय पूलाचा मार्ग
जीएमएलआरच्या वाहतुकीसाठी बोगद्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. गोरेगाव फिल्म सिटीतून निघणारा बोगदा मार्ग मुलुंड खिंडीपाडा येथे बाहेर पडणार आहे. मुलुंड खिंडीपाडा चौक येथे गुरु गोविंद सिंग रोड, भांडुप कॉम्प्लेक्स आणि हेगडेवार चौकवरून वाहतूक होते. त्यामुळे या चौकाच्या ठिकाणी चक्रीय पूलाचा मार्ग बनवण्यात येणार आहे. डॉ. हेगडेवार चौक येथील पूल हा तानसा पाईप लाईन ते डॉ. हेगडेवार चौक ओलांडून, नाहूर रेल्वे स्थानकाजवळील पुलाचा पोहोच रस्त्यापर्यंत आहे. याची लांबी १.८९ कि.मी एवढी असून हे उड्डाणपूल सहा पदरी आहे. या उड्डाणपुलाचे ६० मीटर पुलाचे बांधकाम हे केबल स्टेडवर आधारीत आहे. हे पूल मुंबई मेट्रो रेल्वे ४ च्या खालील बाजूस आहे. या तिन्ही कामांसाठी विविध करांसह ८१९.७४ कोटी खर्च करण्यात येणार आहे. यासाठी एस.पी. सिंगला कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community