पुण्यात पुन्हा एकदा एकाच दिवशी ओमायक्रॉनचे ६ रुग्ण आढळून आले. शुक्रवारी पुण्यात ६ मुंबई व कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी १ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत राज्यभरात ४० रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे.
शुक्रवारी राज्यात नवीन नोंद झालेले आठही नवे ओमायक्रॉनचे रुग्ण पुरुष आहेत. दोन दिवसांपासून कोणत्याही रुग्णांना उपचारांतून डिस्चार्ज मिळालेला नाही. बुधवारपर्यंत एकूण २५ रुग्णांना यशस्वी उपचार पूर्ण करत रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत केवळ १५ ओमायक्रॉनच्या रुग्णांवर राज्यातील विविध भागांत उपचार सुरु आहेत.
शुक्रवारी नव्या ९०२ रुग्णांची नोंद
शुक्रवारी राज्यात नव्याने ९०२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यंदाच्या आठवड्यात पहिल्यांदाच नव्या रुग्णांची नोंद ९००च्या पुढे गेली आहे. मात्र दिवसभरात ६८० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७१ टक्के एवढे झाले आहे. तर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर २.१२ टक्के एवढी आहे. राज्यात आता कोरोनाचे ६ हजार ९०३ अक्टिव्ह रुग्ण आहेत.
( हेही वाचा : गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामही लवकरच सुरु )
शुक्रवारच्या नव्या ८ ओमायक्रॉन रुग्णांबाबत
- सर्व रुग्णांचे जनुकीय तपासणीचे नमुने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच घेण्यात आले होते
- आठही रुग्ण पुरुष आहेत
- २९ ते ४५ वयोगटातील हे ८ रुग्ण आहेत
- यापैकी ७ रुग्ण लक्षणेविरहित आणि १ रुग्णाला सौम्य लक्षणे दिसून आली
- पुण्यातील ४ रुग्णांनी दुबईत प्रवास केला होता. त्यातील २ रुग्ण सहसंपर्कातील आहेत. मुंबईतील एका रुग्णाने अमेरिकेचा प्रवास केला आहे तर कल्याण डोंबिवलीच्या रुग्णाने नायजेरियाचा प्रवास केला आहे.
- या आठही रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत
- आठ रुग्णांपैकी २ रुग्ण रुग्णालयात तर ६ रुग्ण घरी विलगीकरणात आहेत.