हॉटेल, उपहारगृहांमध्ये कोविड नियमांचे पालन करा, अन्यथा…

114

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर हॉटेल्स आणि उपहार गृहे सुरु करण्यात आली असली तरी, आजही या ठिकाणी कोविड नियमांचे पालन होत नाही. हॉटेल्स आणि उपहारगृह व इतर सार्वजनिक आस्थापनांमध्ये गांभीर्याने नियम पाळले जात नसल्याने महापालिकेच्या पथकांना पुन्हा एकदा याठिकाणी भेट देऊन नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहे.

कोविड निर्देशांचे सक्तीने पालन

राज्य शासनाच्या वतीने मुख्य सचिव यांनी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी आदेश निर्गमित करुन सार्वजनिक मर्यादा आखून दिलेल्या आहेत. तसेच, नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान संहितेनुसार तसेच साथरोग व्यवस्थापन कायदा आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याबाबत मुंबई पोलीस प्रशासनाने १४ डिसेंबर २०२१ च्या आदेशांन्वये स्पष्ट केले आहे. या दोन्ही आदेशातील सूचनांचे योग्य ते पालन होणे आवश्यक आहे. सर्व हॉटेल्स्, उपहारगृह, सिनेमागृह, इतर सर्व शासकीय व खासगी आस्थापना आदी सर्व ठिकाणी उपस्थितींच्या नियमांसह कोविड प्रतिबंधात्मक निर्देशांचे सक्तीने पालन करण्यात यावे.

( हेही वाचा : बच्चे कंपनी होणार लसवंत! ‘कोव्होव्हॅक्सला’ WHO ची मान्यता )

लसीकरण पूर्ण करणे आवश्यक

सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेऊन आपले लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह इतर सार्वजनिक ठिकाणी देखील कोविड लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच योग्य ती मुभा असेल. अन्यथा नियमानुसार कारवाई केली जाईल. मुखपट्टी (मास्क) चा योग्यरितीने वापर करणे, हातांची नियमित स्वच्छता राखणे आणि सुरक्षित अंतर राखणे, सर्व परिसर, खोल्या, प्रसाधनगृहे यांची वेळोवेळी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे यासह कोविड प्रतिबंधक सर्व बाबींचे प्रत्येक नागरिकांकडून काटेकोर पालन करण्यात यावे, असे महापालिका आयुक्तांनी म्हटले आहे.

याठिकाणी नियमांचे पालन आवश्यकच

  • -बंदिस्त सभागृहांमध्ये आयोजित होणारे कोणतेही कार्यक्रम / समारंभ / उपक्रम या ठिकाणी, त्या सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के व्यक्तींनाच उपस्थितीची परवानगी आहे.
  • -मोकळ्या / खुल्या जागेत होणाऱया कार्यक्रम / समारंभ / उपक्रम यासाठी सदर जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के एवढ्याच संख्येने उपस्थितीला परवानगी असेल.
  • -मात्र, खुल्या / मोकळ्या जागेतील कोणत्याही आयोजनात एक हजारापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार असतील तर, त्या संदर्भात स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आगावू सूचना देऊन त्याबाबतची पूर्व मंजुरी प्राप्त करणे अत्यावश्यक आहे.
  • -सार्वजनिक ठिकाणी / आस्थापनांमध्ये कार्यरत सर्व मनुष्यबळाचे तसेच कार्यक्रम / समारंभांमध्ये सर्व उपस्थितांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. त्याचे उल्‍लंघन केल्याचे आढळले तर संबंधित आस्थापनांवर नियमानुसार योग्य ती दंडात्मक कारवाई केली जाईल.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.