डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून, त्रिमुखे राहत्या घरीच कॉरंटाईन झाले आहेत. त्रिमुखे यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास अभिषेक त्रिमुखे करत होते. मात्र आता हा तपास सीबीआयने आपल्या हातात घेतल्याने सीबीआयने त्रिमुखे यांच्याकडून मुंबई पोलिसांच्या तपासाची माहिती घेतली आहे. विशेष म्हणजे या केससंदर्भात सीबीआय त्रिमुखे यांच्या संपर्कात असून, पोलीस तपासाची माहिती घेत आहे. दरम्यान अभिषेक त्रिमुखे यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेल्यांची चिंता देखील वाढली आहे.
रिया- त्रिमुखेंच्या संपर्कात
दरम्यान रियाचा एक वर्षाचा कॉल डिटेल रेकॉर्ड समोर आला आहे. एका रिपोर्टमध्ये कॉल डिटेल रेकॉर्ड्सचा हवाला देत दावा करण्यात आला आहे की, रिया चक्रवर्ती वांद्रेचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्या संपर्कात होती. तिने त्यांना दोनदा फोन केला होता आणि त्रिमुखे यांचा रियाला दोनदा कॉल आला होता. एवढेच नाही तर या दोघांमध्ये मेसेजवरही बोलणे झाले होते. २१ जून ते १८ जुलै दरम्यान रिया चक्रवर्ती आणि अभिषेक त्रिमुखे यांच्यात संभाषण झाले. २१ जून रोजी त्रिमुखे यांनी रियाला फोन केला होता आणि सुमारे २८ सेकंद त्यांच्यात बोलणे झाले होते. यानंतर त्यांनी २२ जून रोजी रियाला मेसेज केला होता. २२ जून रोजी त्रिमुखे आणि रिया यांच्यात २९ सेकंद चर्चा झाली. ८ दिवसांनंतर, त्रिमुखेंनी रियाला फोन केला आणि सुमारे ६६ सेकंद त्यांचे बोलणे झाले. १८ जुलै रोजी रियाने डीसीपींना फोन केला होता.
मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण
या संपूर्ण प्रकरणावर मुंबई पोलिसांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. हे फोन कॉल अधिकृत कारणास्तव केले गेले होते. रियाला वांद्रे आणि सांताक्रूझ पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलविण्यात आले. त्यांना ही माहिती देण्यासाठी हे कॉल केले गेले होते असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले होते.
Join Our WhatsApp Community