राज्यात तब्बल दीड कोटी नागरिकांना ओमायक्रोनचा धोका

109

राज्यात जरी कोरोना नियंत्रणात असला तरी ओमायक्रोनने आता जोर पकडल्याचे चित्र आहे. दिवसागणिक नवनवीन रुग्ण सापडत आहेत. याचा फैलावही डेल्टाच्या तुलनेत कित्येक पटीने आहे याचा संसर्ग लसीकरण न झालेल्या नागरिकांना लगेच होत आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांचे लसीकरण करण्याकडे सरकारचा प्रयत्न आहे. मात्र तरीही लोक या लसीकरणाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. आता पर्यंत दीड कोटी नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला नसल्याची माहिती आहे. यावरून एवढ्या संख्येने नागरिकांना कोरोनाच्या ओमायक्रॉनचा धोका आहे, असे दिसते.

डिसेंबरमध्ये लसीकरण वाढलेले 

सुमारे १ कोटी ४१ लाख नागरिकांनी लशीची पहिली मात्राही घेतलेली नाही. यातील ठाणे जिल्ह्यातील नागरिक सर्वाधिक  १३ लाख ८३ हजार नागरिक आहेत. या खालोखाल नाशिक, जळगाव, नगर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नोव्हेंबरमध्ये कमी झाल्यानंतर लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी कमी होत गेली. परंतु डिसेंबरमध्ये ओमायक्रॉनच्या भीतीने पुन्हा लसीकरणासाठी गर्दी वाढू लागली. जानेवारीपासून सुरू झालेल्या या लसीकरण मोहिमेत सर्वाधिक दैनंदिन सरासरी लसीकरण डिसेंबरमध्ये झाले आहे. या काळात रोज सरासरी ८ लाख ७९ हजार नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरणाचा वेग वाढला असला तरी अजूनही राज्यात १५ टक्के नागरिकांना लशीची पहिली मात्रा देणे बाकी आहे.

(हेही वाचा पंतप्रधान मोदींनी निभावला राजधर्म; लेफ्टनंट जनरल हुडांच्या बहिणीला दिले आश्वासन)

‘या’ जिल्ह्यांत लसीकरण कमी 

राज्यात पहिली मात्रा न घेतलेले सर्वाधिक नागरिक ठाण्यात आहेत. यानंतर नाशिकमध्ये सुमारे ११ लाख ४० हजार, जळगावमध्ये  सुमारे ८ लाख ५६ हजार, नगरमध्ये सुमारे ८ लाख ४५ हजार आणि नांदेडमध्ये ८ लाख १६ हजार नागरिकांनी पहिली मात्रा घेतलेली नाही. रत्नागिरी, वर्धा, भंडारा आणि सिंधुदुर्ग वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण एक लाखांहून अधिक आहे. पहिली मात्राही न घेतलेल्या नागरिकांची सर्वात कमी संख्या सुमारे ३० हजार सिंधुदुर्गमध्ये आहे. कोविनच्या आकडेवारीनुसार तर मुंबईत पहिल्या मात्रेचे लसीकरण १०६ टक्क्यांवर गेले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.