मरणानंतरही मृतदेहाची हेळसांड

199

मुंबई सेंट्रल येथील महापालिकेच्या नायर रुग्णालयातील शवागृहात मृतदेह अक्षरशः जमिनीवर एकमेकांवर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समाजमाध्यमांवर प्रसारित झाला. रविवारी सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी फेसबुक या समाज माध्यमावर मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर पालिका रुग्णालयातील शवागृहातील भयावह स्थिती दाखवणारे छायाचित्र प्रसिद्ध केले. हे मृतदेह अत्यंत विचित्र अवस्थेत एकमेकांवर ठेवलेले असल्याचे दिसून येत असल्याने मरणानंतरही होणा-या मृतदेहांची हेळसांड पाहून पालिका प्रशासनाविरोधात प्रक्षोभक वातावरण निर्माण झाले. ही पोलखोल होताच नायर रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी सारवासारव केली. दुरुस्ती करताना काही वेळा मृतदेह कप्प्याबाहेर काढून पुन्हा ठेवले जात असल्याचे स्पष्टीकरण नायर रुग्णालयाकडून देण्यात आले.

नायर रुग्णालयातील शवगृहात नजीकच्या रेल्वे व रस्ते अपघातातील अनेक बेवारस मृतदेह पोलिसांकडून पाठवले जातात. या मृतदेहांचे शवविच्छेद केल्यानंतरही कित्येकदा मृतदेहाची ओळख पटत नाही. त्यामुळे कित्येक बेवारस मृतदेह शवागृहातच राहतात. नायर रुग्णालयात कित्येक मृतदेह शवागृहातील शीतपेटीत ठेवणे अपेक्षित आहेत. मात्र सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये मृतदेह सांभाळण्यात पालिका प्रशासनाची कमतरता दिसून आली.

(हेही वाचा मलिकांना पुन्हा झाली पाहुण्यांची आठवण! म्हणाले…)

सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

  • नायर रुग्णालयाच्या शवागृहातील शीतकालीन यंत्रणा व्यवस्थित काम करत नाही आहे. परिणामी बेवारस मृतदेह योग्य पद्धतीने सांभाळले जात नाही
  • कित्येक महिने बेवारस मृतदेह नायर रुग्णालयातील शवागृहात व्यवस्थित सांभाळले जात नाही. रुग्णालयातील अधिका-यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मृतदेहांची हेळसांड होत आहे
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दोषींवर कारवाई करावी

नायर रुग्णालयाचे स्पष्टीकरण 

  • रुग्णालयात दाखल होणा-या अनोळखी व इतर मृतदेहांना शवागारातील शीतगृहात योग्य पद्धतीने ठेवले जाते. अनोळखी मृतदेहांची ओळख पटवून विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पोलिसांकडून पार पाडली जाते
  • अनेकदा मृतदेहाची ओळख पटण्यात विलंब होतो. त्यामुळे कित्येकदा मृतदेह दोन-तीन महिने शवागृहातच राहतात. एकही कप्पा रिकामा नसल्यास यंत्रणेवर ताण येतो.
  • नियमित दुरुस्तीच्या कामासाठी मृतदेह कप्प्याबाहेर काढले जातात. पुन्हा ते कप्प्यात ठेवताना कर्मचा-यांची कसरत होते.
  • अनोळखी मृतदेहांची ओळख लवकरात लवकर पटवून घेण्यासाठी तसेच परत पोलिसांनी घेऊन जावेत, यासाठी रुग्णालय प्रशासन सातत्याने संबंधित पोलिस ठाण्याशी पाठपुरावा करत असते.

आरोप अंगाशी आल्यानंतर…

शवागर शीतगृहाची नियमित दुरुस्ती करत असताना आणि ओळख पटलेले मृतदेह घेऊन जाण्याची कार्यवाही सुरु असताना अज्ञात व्यक्तीने गैरहेतूने मृतदेहांचे फोटो काढलेत. समाजमाध्यमांवर संबंधित प्रकरणाबाबत दिलेली माहिती चुकीची आहे. महानगरपालिका व नायर रुग्णालय प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न असून, रुग्णालयाच्या कामगिरीवर लोकांनी विश्वास ठेवावा.

– नायर रुग्णालय प्रशासन

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.