नवीन बाईक घेणं सगळ्यांनाच परवडत असे नाही. त्यातच तरुणाईत बाईकचे क्रेज प्रचंड असते. आता यावर उपाय काढत आपली हौसही भागेल आणि कामही होईल, या संकल्पनेतून पुणे शहरात बाईक भाडेतत्त्वावर देण्याचा उपक्रम सुरु आहे. अनियमित बस सेवा, वाढते इंधन दर, पार्किंग आणि बाईकच्या देखभालीचा खर्च या कटकटीत पडण्यापेक्षा पुण्यातील नागरिक, विशेषत: तरुणाई या सेवेचा लाभ घेत आहेत.
महाविद्यालयीन मुलांमध्ये क्रेज
एसबी रोडवर स्वप्निल पडतारे यांचे ऑटो स्पेअर पार्टचे दुकान आहे. पडतारे सांगतात की, माझ्याकडे 5 बाईक आणि 5 नाॅन गिअर वाहने भाड्याने उपलब्ध आहेत. आम्ही सेकंड हॅंड बाईक खरेदी करतो, त्या दुरुस्त करतो आणि त्यानंतर भाड्याने दिल्या जातात. लॉकडाऊन दरम्यान, लोकांची संख्या कमी होती, परंतु बाईक भाड्याने घेण्याचे प्रमाण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असल्याचेही पडतारे यांनी सांगितले. भाड्याने वाहन उपलब्ध करून देण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून सर्व कागदोपत्री कामे केली जातात. भाड्याने बाईक घेणा-या व्यक्तीच्या ओळखपत्राची झेरॉक्स प्रत दुकान मालकाकडे ठेवली जाते. या उपक्रमात एक ठराविक भाडे ठरवण्यात आलेले नाही, ते संबंधित मालक ठरवतात. काही लोक किलोमीटरनुसार भाड्याने दुचाकी घेतात, तर काही पूर्ण दिवस भाड्याने घेतात, असे पडतारे यांनी सांगितले.
बेकायदेशीर सेवा दिली जात आहे
रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी मात्र यावर आक्षेप घेतला आहे. नितीन पवार म्हणाले की, एवढ्या तक्रारींनंतरही अशी सेवा देणाऱ्या कंपन्या आणि दुकानदारांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. रिक्षाचालकांना सर्व नियम लागू आहेत, तर हे लोक त्यांची वाहने बेकायदेशीरपणे भाड्याने देत आहेत, असे पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community