महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक बहुजन समाज आहे. यात अनेक विविध आठरापगड जाती आहेत. यांच्या वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, खाण-पिण्याच्या वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती आहेत. प्रत्येक समाजाचं इथे एक लोक साहित्य, लोक परंपरा आहेत. यामुळे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव टिकून आहे, विविधता टिकून आहे. हा समाज आधुनिकतेकडे जातोच आहे, पण त्यासोबतच तो निसर्गाशी बांधील आहे. परंतु आजही आपल्याला विविध क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळावं यासाठी झगडत आहे. कारण प्रस्थापितांच्या सांस्कृतिक ओझ्याखाली हा समाज दबलेला आहे. फक्त राजकीय हक्कांचाच आवाज दाबला जात नाही, तर त्याचा सांस्कृतिक आवाजही दाबला जातो, असे गोपीचंद पडळकर पुणे येथे होणा-या मल्हार महोत्सवासाठी आमंत्रण देताना म्हणाले.
पुणे येथे भरणार मल्हार महोत्सव
हा बहुजन समाज कितीही विखुरलेला असला तरी एका ठिकाणी आपला माथा टेकवायला येतो. ती जागा म्हणजे महाराष्ट्राचं कुलदैवत, लोकदैवत, बहुजनांचं उर्जा आणि प्रेरणास्थान म्हणजे जेजुरीचा मल्हारी मार्तंड खंडोबा. इथे सर्वजण भक्ती भावाने येतात, कुठलाही भेदभाव नाही. म्हणूनच हाच धागा पकडत, हीच एकत्र येण्याची परंपरा राखत आम्ही महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचं, महाराष्ट्रातील लोक संस्कृतीचा ‘मल्हार महोत्सव २०२२’ चं आयोजन करत आहोत. हा उत्सव द्विवार्षिक असेल. येणाऱ्या वर्षात म्हणजेच १५ जानेवारी २०२२ ते १६ जानेवारी २०२२ रोजी मल्हारी मार्तंड खंडोबाचा भंडारा उधळून पुणे येथे मल्हार महोत्सव पार पडणार आहे.
( हेही वाचा :व्हॉट्सअॅप वरील हे नवं शानदार फिचर तुम्हाला माहिती आहे का? )
महाराष्ट्राच्या वैभवाचा सन्मान
हा लोक परंपरेचा, देवाण-घेवाणीचा, नव्यानं आपल्या लोकपरंपरा समजून घेण्याचा, नव्या पिढीला हे समजावं यासाठीचा एक लोक उत्सव आहे. हा पुर्णत: सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वच लोक परंपरेवर व लोककलेवर प्रेम करणारे सर्वच जण आमंत्रित आहेत. या महोत्सवात विविध क्षेत्रातील कलाकार, लोक कलाकार, तज्ज्ञ, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या जाणत्या मंडळींना तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. मुळात हा उत्सव व सोहळा आहे. ज्यातून बहुजन समाजातील विविध घटकांमध्ये एक संवाद साधला जावा, तसेच सांस्कृतिक आदानप्रदान होईल. एकामेकांच्या संस्कृतीविषयी जाणून घ्यायला मिळेल. नव्या पिढीला प्रेरणा मिळेल. महाराष्ट्राचं वैभव असणाऱ्या लोक कलेला सन्मानित केलं जाईल. आपण सर्वजण आमंत्रित आहात, असे पडळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community