केंद्र सरकारने एप्रिल 2021 मध्ये अखिल भारतीय तिमाही आस्थापना आधारित रोजगार सर्वेक्षण (AQEES) सुरू केले . एप्रिल ते जून 2021 या कालावधीसाठी तिमाही रोजगार सर्वेक्षणाच्या पहिल्या फेरीच्या निकालानुसार, नऊ निवडक क्षेत्रांमध्ये रोजगार वाढून 3.08 कोटी इतका झाला आहे.
या क्षेत्रांत वाढला रोजगार
सहाव्या आर्थिक जनगणनेत (2013-14) करण्यात आलेल्या नोंदीनुसार या क्षेत्रांमधील यापूर्वीच्या एकूण 2 कोटी 37 लाख रोजगारांच्या तुलनेत ही वाढ 29 टक्के आहे. माहिती तंत्रज्ञान /बीपीओ क्षेत्रात सर्वाधिक 152 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे, तर आरोग्य क्षेत्रात 77 टक्के, शिक्षण क्षेत्रात 39 टक्के, उत्पादन क्षेत्रात 22 टक्के, वाहतूक क्षेत्रात 68 टक्के आणि बांधकाम क्षेत्रात 42 टक्के वाढ झाली आहे. वार्षिक श्रम बल सर्वेक्षण (PLFS) अहवालानुसार, देशातील सर्वसाधारण स्थितीच्या आधारे 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी अंदाजे बेरोजगारी दर 2017-18 मध्ये 6, 2018-19 मध्ये 5.8 आणि 2019-20 मध्ये 4.8 इतका होता.
आत्मनिर्भर भारत पॅकेजमधून प्रोत्साहन
रोजगार निर्मिती आणि रोजगार क्षमता सुधारण्यावर सरकारचे प्राधान्य आहे. त्यानुसार केंद्र सरकारने देशात रोजगार निर्मितीसाठी विविध पावले उचलली आहेत. केंद्र सरकार पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP), पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, दीनदयाळ अंतोदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) आणि प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) सारख्या लक्षणीय गुंतवणूक आणि सार्वजनिक खर्च असलेल्या विविध प्रकल्पांना प्रोत्साहन देत आहे. केंद्र सरकारने उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि कोविड 19 चे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेज अंतर्गत सरकार 27 लाख कोटी रुपयांहून अधिक आर्थिक प्रोत्साहन देत आहे.
मंत्र्यांनी दिली माहिती
6 राज्यांमधील निवडक 116 जिल्ह्यांमध्ये, ग्रामीण भागातील तरुणांसह परत आलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी आणि अन्य प्रभावित लोकांसाठी रोजगार आणि उपजीविकेच्या संधींना चालना देण्यासाठी सरकारने 20 जून, 2020 रोजी 125 दिवसांचे गरीब कल्याण रोजगार अभियान (GKRA) देखील सुरू केले आहे. नियोक्त्यांना सामाजिक सुरक्षा लाभांसह नवीन रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि कोविड-19 महामारी दरम्यान झालेले रोजगाराचे नुकसान भरून काढण्यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेज 3.0 चा एक भाग म्हणून आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (ABRY) 1 ऑक्टोबर 2020 पासून लागू करण्यात आली आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांना खेळते भांडवल कर्ज पुरवण्यासाठी पंतप्रधान स्वनिधी (PM SVANidhi) योजना 1 जून 2020 रोजी सुरू करण्यात आली आहे. स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी सरकार प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सारखे अनेक उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांव्यतिरिक्त, सरकारच्या विविध प्रमुख कार्यक्रमांचा उत्तम रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर आहे. श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
( हेही वाचा: कुत्राही कुत्र्याला देतोय जीवदान! कसे ते जाणून घ्या…)
Join Our WhatsApp Community